अग्निपथ वाद: सैन्यात भरतीसाठी दोन वर्षे जीवतोड मेहनत घेत होता; तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 03:42 PM2022-06-16T15:42:33+5:302022-06-17T19:13:08+5:30
पोलिसांनी हॉस्टेलमधील त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. सकाळी पीजीच्या तरुणांनी त्याचा मृतदेह दोरीला लटकताना पाहिला आणि हॉस्टेल संचालकाला माहिती दिली.
रोहतक: अग्निपथ या सैन्यातील भरती मोहिमेवरून पाच राज्यातील वातावरण पेटलेले असताना आता सैन्य भरतीसाठी दोन वर्षांपासून जिवतोड मेहनत करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे.
हरियाणाच्या रोहतकमधील एका पीजी हॉस्टेलमध्ये सचिन नावाच्या तरुणाने गळफास लावून घेतला. तो जींदच्या लिजवानाचा रहिवासी आहे. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सैन्यात भरती व्हायचे होते, यासाठी तो खूप मेहनत घेत होता, अशी माहिती दिली आहे.
पोलिसांनी हॉस्टेलमधील त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. सकाळी पीजीच्या तरुणांनी त्याचा मृतदेह दोरीला लटकताना पाहिला आणि हॉस्टेल संचालकाला माहिती दिली. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. त्याच्यासोबत त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणाने मीडियाला सांगितले की, लष्करात भरतीसाठी तो दोनदा क्वालिफाय झाला होता. मात्र, भरती झाली नाही. यामुळे तो त्रस्त होता.
केंद्राच्या अग्निपथ या सैन्यात ४ वर्षांसाठी भरतीच्या योजनेवरून पाच राज्यांत मोठा गोंधळ उडाला आहे. संतप्त झालेल्या तरुणांनी विविध ठिकाणी काही ट्रेनचे डबेदेखील जाळले आहेत. तसेच दगडफेक आणि हिंसाचारही सुरु झाला आहे. चार वर्षांनी पुढे काय, असा प्रश्न हे तरुण विचारत आहेत.