एका रसगुल्ल्यामुळे लग्न मंडपात पसरली शोककळा; नवरीचं कुटुंब फरार, १२ जखमी अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 05:31 PM2022-10-27T17:31:32+5:302022-10-27T17:32:22+5:30
खुर्ची, चाकू, ताट, चमचा, काटा, हातात जे काही मिळेल त्याला शस्त्र बनवलं. या हाणामारीत २० वर्षीय सनीचा चाकू लागल्याने मृत्यू झाला.
आग्रा येथे एका रसगुल्ल्यामुळे लग्नाच्या आनंदात दु:खाचं विरजन पडलं आहे. लग्नाच्या वऱ्हाडासोबत आलेल्या २० वर्षीय मुलाचा चाकू लागल्याने मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर वऱ्हाड लग्नाशिवाय माघारी परतलं. बुधवारी ही घटना घडली. खंडौली येथे राहणारे व्यापारी वकार यांची दोन मुले जावेद आणि रशीद यांचा विवाह एतमादपूर येथे राहणार्या उस्मानच्या मुली जैनब आणि साजिया यांच्याशी होणार होता.
वऱ्हाडी मंडळींना जेवण दिले जात होते. एका पाहुण्याने रसगुल्ला आवडल्यामुळे आणखी एक खाण्यासाठी मागितला. त्यावर काउंटरवर उभ्या असलेल्या तरुणाने प्रत्येकाला एक-एक मिळेल असं सांगितल्याने वाद झाला. या वादाचे रुपांतर रक्तरंजित चकमकीत झाले. दोन्ही बाजूची मंडळी एकमेकांना भिडली. खुर्ची, चाकू, ताट, चमचा, काटा, हातात जे काही मिळेल त्याला शस्त्र बनवलं. या हाणामारीत २० वर्षीय सनीचा चाकू लागल्याने मृत्यू झाला.
अर्ध वऱ्हाड जेवून परत निघाले
मृत युवक सनीचा काका इम्रान यांनी सांगितले की, आम्ही वेळेवर वऱ्हाड घेऊन विनायक भवनला पोहोचलो होतो. वऱ्हाड येताच जेवणाच्या पंगती बसल्या. दीड तासात जेवण करून अर्ध वऱ्हाड परत निघालं होतं. प्रत्येकाला घरी जायचे होते. लग्नासाठी वराचे काही खास नातेवाईक आणि मित्रच राहिले होते.
सनीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
या घटनेमुळे नववधूंच्या घरी शोककळा पसरली असून, मृत सनीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आता पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मृत सनीचे काकाने महिलांचा छळ आणि दागिने लुटण्यात आल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणी एसपी सत्यजीत गुप्ता म्हणाले की, या घटनेत शाहरुख, निजाम, शकील, जानू, रहमान रमिया यांच्यासह १२ जणांपेक्षा अधिक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटना झाल्यापासून नवरीकडचं संपूर्ण कुटुंब फरार झालं आहे.