BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 01:54 PM2024-11-22T13:54:18+5:302024-11-22T13:54:52+5:30

बीबीएचं शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ६० लाखांची बीएमडब्ल्यू कार चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ahmedabad 23 year old bba graduate steals 60 lakh bmw from showroom arrested in morbi | BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार

फोटो - आजतक

बीबीएचं शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ६० लाखांची बीएमडब्ल्यू कार चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबाद येथील शोरूममधून आलिशान कार घेऊन तो फरार झाला होता. तपासाअंती पोलिसांनी आरोपीला मोरबी येथून अटक केली. शोरूमचा कर्मचारी असल्याचं भासवून या तरुणाने ट्रेलर डायव्हर व क्लिनरला चकवा देत कार चतुराईने पळवून नेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कार फॅक्टरीतून अहमदाबाद शोरूममध्ये पोहोचलेल्या सहा बीएमडब्ल्यू कारपैकी एक २३ वर्षीय तरुणाने नेली होती. बीबीएचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला व्यवसाय करायचा होता, मात्र पैसे नसल्याने त्याने अहमदाबादला बीएमडब्ल्यू कार देण्यासाठी आलेल्या ट्रेलरच्या ड्रायव्हर आणि क्लिनरला शोरूमचे कर्मचारी म्हणून ओळख करून दिली आणि ६० लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार घेऊन पळ काढला.

पोलिसांनी सांगितलं की, १२ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूहून ६ बीएमडब्ल्यू कार ट्रेलरमध्ये भरून अहमदाबादमधील शोरूममध्ये डिलिव्हरीसाठी आणल्या होत्या. यानंतर १९ नोव्हेंबर रोजी सकाळी शोरूम बंद असल्याने ट्रेलर ड्रायव्हर व क्लीनर शोरूमजवळ महामार्गावर शोरूम उघडण्याची वाट पाहू लागले.

याच दरम्यान, बीएमडब्ल्यू शोरूमचा कर्मचारी असल्याची ओळख देत या तरुणाने ट्रेलरमध्ये भरलेल्या तीन बीएमडब्ल्यू कार एकामागून एक खाली उतरवल्या. गौरांग ६०,४६,५५१ रुपये किमतीची BMW 17FH Ld Sedan LWV RHD CC4W मॉडेलची राखाडी रंगाची कार शोरूममध्ये सोडून येतो असं सांगितलं आणि फरार झाला होता.

ही बाब उघडकीस येताच राजकुमार यादव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितलं की, आम्ही जवळचे सीसीटीव्ही तपासले आणि समजलं की एक बीएमडब्ल्यू कार अहमदाबादहून सानंदच्या दिशेने निघाली होती. चौकशी केली असता बीएमडब्ल्यू घेऊन पळून गेलेल्या व्यक्तीने पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरल्याचं निष्पन्न झालं, त्यानंतर हा व्यक्ती बीएमडब्ल्यूने कच्छच्या दिशेने निघाला.

यानंतर रस्त्यावर येणाऱ्या सर्व टोल नाक्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून गाडीचा पाठलाग करण्यात आला. मोरबीतील हदवड नंतर कच्छकडे जाणाऱ्या अनियारी टोलटॅक्स येथे गाडीचं शेवटचं लोकेशन सापडलं. यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांकडून माहिती घेतली, त्यानंतर मोरबी पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. कार मोरबीकडे येत असताना कारसह तरुणाला अटक करण्यात आली.

Web Title: ahmedabad 23 year old bba graduate steals 60 lakh bmw from showroom arrested in morbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.