AIने केला चमत्कार! मृतदेहाचे डोळे उघडून फोटो काढला अन् आरोपींचा करेक्ट कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:26 PM2024-01-24T13:26:31+5:302024-01-24T13:27:32+5:30
मृत तरुणाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याचं ठरवलं.
Delhi Murder Case ( Marathi News ) : आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये झालेल्या प्रगतीने अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, यावर त्याचे फायदे-तोटे अवलंबून आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता पोलीसही करू लागले आहेत. दिल्ली पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करत एका हत्या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात यश मिळवलं आहे. पोलिसांनी 'एआय'च्या मदतीने मृतदेहाचे डोळे उघडे दाखवून फोटो काढला आणि मृताची ओळख पटवली. त्यानंतर तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या. ही घटना उत्तर दिल्लीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांना गीता कॉलोनी फ्लायओव्हरच्या खाली एका तरुणाचा मृतदेह आढळला. सदर तरुणाच्या शवविच्छेदनानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. मात्र मृत तरुणाची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याचं ठरवलं.
कसा झाला 'एआय'चा फायदा?
हत्येनंतर तरुणाचा मृतदेह फ्लायओव्हरखाली फेकण्यात आल्याने त्याची ओळख पटवणं कठीण जात होतं. मृतदेहाच्या फोटोद्वारे त्याला ओळखणं शक्य नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी एआयचा वापर करून मृतदेहाचे डोळे उघडे असल्याचा फोटो तयार केला आणि त्या फोटोचे पोस्टर्स बनवत दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी लावले. हे पोस्टर्स विविध व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये आणि पोलीस ठाण्यांमध्येही शेअर करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी लावलेले पोस्टर्स पाहून एक कॉल आला आणि मी सदर तरुणाचा भाऊ बोलत असल्याचे समोरून सांगण्यात आले. त्यानंतर मृत तरुणाचे नाव हितेंद्र असं असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी हितेंद्रच्या नातेवाईकांची चौकशी करत तपासाला सुरुवात केली. त्यानंतर हितेंद्रचे तीन तरुणांशी भांडण झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्यांनीच हितेंद्रची हत्या केल्याचे कबुल केले.