धक्कादायक! हनी ट्र्रॅपमध्ये अडकला हवाई दलाचा जवान; हेरगिरीच्या आरोपाखाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 09:22 AM2022-05-12T09:22:34+5:302022-05-12T09:22:51+5:30
पोलिसांनी आरोपी देवेंद्र शर्मा यांना सहा मे रोजी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे अटक केली.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारतीय हवाईदलाच्या एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. देवेंद्र शर्मा असे आरोपीचे नाव आहे. देवेंद्र शर्मा यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून हवाई दलाशी संबंधित काही संवेदनशील माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यचा आरोप आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, कोण-कोणत्या ठिकाणी किती रडार तैनात आहे, यापासून ते उच्चाधिकाऱ्यांची नावे आणि त्याच्या पत्त्यांपर्यंत आरोपीकडे विचारणा करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपी देवेंद्र शर्मा यांना सहा मे रोजी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे अटक केली. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा यांना धौला कुआं येथून अटक करण्यात आली आहे. ते मुळचे कानपूर येथील आहेत.
देवेंद्र शर्मा यांची एका महिला प्रोफाईलसोबत फेसबूकवर मैत्री झाल. यानंतर त्यांना फोन सेक्सच्या माध्यमाने ट्रॅपमध्ये घेण्यात आले आणि नंतर त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित महिला ज्या क्रमांकावरून देवेंद्र शर्मा यांच्यासोबत बोलत होती, तो भारतीय सर्व्हिस प्रोव्हायडरचा नंबर आहे.
पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत. एवढेच नाही, तर या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचाही संशय आहे. एवढेच नाही, तर पोलिसांना आरोपीच्या पत्नीच्या बँक अकाउंटमध्ये संशयास्पद ट्रांझेक्शनही आढळून आले आहेत.