ऐरोली गोळीबार: पित्याला मुलांपेक्षा होती संपत्ती प्रिय; थकबाकी भरण्यास सांगितल्याने घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:16 AM2021-06-16T09:16:34+5:302021-06-16T09:17:11+5:30

गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली.

Airoli shooting: ex police officer loved property more than children | ऐरोली गोळीबार: पित्याला मुलांपेक्षा होती संपत्ती प्रिय; थकबाकी भरण्यास सांगितल्याने घेतला जीव

ऐरोली गोळीबार: पित्याला मुलांपेक्षा होती संपत्ती प्रिय; थकबाकी भरण्यास सांगितल्याने घेतला जीव

googlenewsNext

- सूर्यकांत वाघमारे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : स्वतःच्या दोन मुलांवर गोळीबार करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मुलांपेक्षा संपत्ती अधिक प्रिय होती. त्यांना महिन्याचे दीड लाखाहून अधिक उत्पन्न येत असतानाही कुटुंबाच्या गरजा भागवण्यात हात आखडता घेण्याची सवय होती. यातूनच स्वतः वापरत असलेल्या गाडीच्या दुरुस्ती व इन्शुरन्सचे पैसे थकीत ठेवले होते. याबाबत मुलाने ऐकवल्याच्या रागातून त्यांनी गोळी झाडल्याचे उघड झाले. 

निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी स्वतःच्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ऐरोलीत घडली. यामध्ये दोन गोळ्या लागल्याने विजय याचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरा मुलगा सुजय याची प्रकृती स्थिर आहे. भगवान हे ऐरोली सेक्टर ३ येथे पत्नी, मोठा अपंग मुलगा अजय, त्याची पत्नी व दोन मुले यांच्यासह राहायला आहेत. दहा वर्षांपूर्वी ते नवी मुंबई पोलीस दलाच्या सुरक्षा शाखेतून निवृत्त झाले असून त्यापूर्वी रबाळे, तुर्भे पोलीस ठाण्यात त्यांनी काम केलेले आहे. त्यांचा मधला मुलगा विजय हा वसईला व लहान मुलगा सुजय हा ऐरोलीतच काही अंतरावर राहायला आहे. 

भगवान यांनी स्वतः वापरत असलेल्या इनोव्हा कारच्या दुरुस्तीचे व इन्शुरन्सचे सुमारे १२ हजार रुपये थकवले होते. पोलिसाचा रुबाब झाडून बिलाचे पैसे थकीत ठेवण्याची त्यांना सवय असल्याची चर्चा परिसरात आहे. यामुळे त्यांच्याकडे असलेल्या थकबाकीसाठी अनेक जण मुलांना फोन करायचे. अशाच प्रकारातून गाडीच्या विम्याच्या व दुरुस्तीच्या थकीत पैशासाठी संबंधिताने विजयला फोन केला होता. त्यावरून विजयने वडिलांना फोन करून थकीत पैसे भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने त्यांनी त्याला घरी बोलावले होते. त्यानुसार संध्याकाळी विजय हा वसईवरून ऐरोलीला आला असता झालेल्या भांडणातून भगवान यांनी विजयवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर घरातच उपस्थित असलेल्या सुजयवर देखील गोळी झाडली. परंतु ती गोळी सुजयच्या पोटाला घासून गेल्याने तो बचावला. 

घरखर्चात आखडता हात 
भगवान यांची खारघर, ऐरोली व इतर ठिकाणी घरे असून ती भाड्याने दिलेली आहे. यातून त्यांना महिना दीड लाखाहून अधिक उत्पन्न मिळते. परंतु घरखर्चासाठी पत्नीला केवळ महिना १५ ते १७ हजार रुपये दिले जायचे. त्यामुळे घरखर्च भागवण्यास त्यांची पत्नी व मोठी सून जेवणाचे डबे पुरविण्याचे काम करतात. 

सुजयवरही होता जुना राग 
गोळीबारात बचावलेल्या सुजयने काही वर्षांपूर्वी वडिलांच्या बँक खात्यातून परस्पर ४ लाख रुपये काढले होते. याचा राग भगवान यांच्या मनात होता. सोमवारी विजयसोबत भांडण सुरू असताना सुजयदेखील तिथे उपस्थित होता. त्यामुळे सुजयवरदेखील जुना राग काढत गोळी झाडली.

Web Title: Airoli shooting: ex police officer loved property more than children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.