अजनी विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरण : पोलीस ठाण्यावर पालकांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:46 PM2019-11-21T23:46:47+5:302019-11-21T23:48:09+5:30
नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत शाळेतील शिक्षकाने केलेल्या गैरप्रकारामुळे पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे अफवांचा बाजार गरम होतो आहे. आज दुपारी असाच प्रकार पुन्हा घडल्यामुळे संतप्त पालकांनी अजनी ठाण्यावर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत शाळेतील शिक्षकाने केलेल्या गैरप्रकारामुळे पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे अफवांचा बाजार गरम होतो आहे. आज दुपारी असाच प्रकार पुन्हा घडल्यामुळे संतप्त पालकांनी अजनी ठाण्यावर धडक दिली. दरम्यान, आज अजनी पोलिसांनी आरोपी शिक्षकाची न्यायालयातून दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून घेतली आहे.
अजनीतील एका खासगी शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत संगीत शिक्षक जोना टिमोथी याने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यामुळे तिची प्रकृती बिघडली असून, तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकाराचा बोभाटा होताच पालकांच्या भावनांचा बांध फुटला. पीडित मुलीच्या नातेवाईकांसोबतच अन्य पालकांनी १८ नोव्हेंबरला शाळा प्रशासनाला या संतापजनक प्रकाराबाबत जाब विचारला. दोषी शिक्षकाची चौकशी करून शाळा प्रशासनाने आधीच टिमोथी याच्यावर प्रशासकीय कारवाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. त्यानंतर पालकांनी अजनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हापासून वेगवेगळ्या अफवा पसरत आहे. पोलिसांनी आरोपीला सुविधा दिल्याचाही आरोप होता. प्रत्यक्षात पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपीला अटक केली आणि त्याचा पीसीआरही मिळवला. आज त्याच्या पीसीआरची मुदत संपल्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. गुन्ह्यातील अनेक बाबी तपासायच्या असल्यामुळे आणखी दोन दिवस पीसीआर हवा, असा पोलिसांनी युक्तिवाद केला. तो मान्य करीत आरोपी टिमोथीला दोन दिवसांचा वाढीव पीसीआर मंजूर करण्यात आला. याच दरम्यान पुन्हा अफवांचा बाजार गरम झाल्याने मोठ्या संख्येत पालक अजनी ठाण्यावर धडकले होते. या प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा होईल, असे ठोस आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर पालक शांत झाले.