अजमेर गँगरेप प्रकरणातील 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; 100+ तरुणींवर झालेला अत्याचार...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 04:32 PM2024-08-20T16:32:29+5:302024-08-20T16:33:10+5:30
नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन आणि इक्बाल भाटी अशी आरोपींची नावे आहेत.
Ajmer Gangrape and Blackmail News : 32 वर्षांपूर्वी राजस्थानच्या अजमेरमध्ये घडलेल्या बहुचर्चित सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणाचा आज निकाल लागला. विशेष पोक्सो न्यायालयाने 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय प्रत्येकी 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नफीस चिश्ती, नसीम उर्फ टारझन, सलीम चिश्ती, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन आणि इक्बाल भाटी अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 1992 मध्ये आरोपींनी अजमेरमधील 100 हून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला होता. यानंतर त्यांची अश्लील छायाचित्रे काढून पीडितांना ब्लॅकमेल करण्यात आले होते. या प्रकरणात एकूण 19 आरोपी होते, त्यापैकी नऊ जणांना आतापर्यंत शिक्षा झाली आहे. या घटनेनंतर दोन वर्षांनी 1994 मध्ये आणखी एका आरोपीने आत्महत्या केली, तर एक आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित 6 आरोपींबाबत आज न्यायालयाने निकाल दिला.
Rajasthan: In Ajmer's largest blackmail case, six accused, including Nafees Chishti and Naseem alias Tarzan, were found guilty by the Special POCSO Act Court. They blackmailed over 100 girls with obscene photos from 1992 pic.twitter.com/pqwkoPo1fk
— IANS (@ians_india) August 20, 2024
अपहरणानंतर करायचे बलात्कार...
आरोपी आधी तरुणींना आमिष दाखवून त्यांचे अपहरण करायचे आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांची आक्षेपार्ह फोटो काढायचे. पुढे हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना वारंवार ब्लॅकमेल केले जायचे. पीडित मुलींचे वय 11 ते 20 च्या आसपास होते. या मुली अजमेरच्या एका नामांकित शाळेत शिकायच्या. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर राजस्थानच्या तत्कालीन भैरो सिंह शेखावत सरकारने सीबीसीआय तपासाचे आदेश दिले होते.
या घटनेतील आरोपींच्या मागे राजकीय हात होता, त्यामुळे सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. धमक्यांना घाबरुन पीडित तरुणींना पोलिसांना जबाब देण्याचे टाळले होते. आरोपींचा प्रभाव जास्त असल्याने पोलीसही कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर, तत्कालीन मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांच्या आदेशावरून पोलिसांना गुन्हा नोंदवावा लागला. अजमेरच्या या सत्य घटनेवर 'अजमेर डायरी' नावाचा चित्रपटही बनवण्यात आला आहे.