भयंकर! पत्नीला मारलं, पोत्यात भरलं पण पोतंच फाटलं अन् हात आला बाहेर; 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 03:32 PM2022-11-24T15:32:18+5:302022-11-24T15:39:56+5:30
एका व्यक्तीने लग्नानंतर 26 व्या दिवशीच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रेमविवाह होता.
राजस्थानच्या अजमेरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने लग्नानंतर 26 व्या दिवशीच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रेमविवाह होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश केसवानी याने 29 ऑक्टोबरला जेनिफर नावाच्या तरुणीसोबत लग्न केलं होतं.
शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पती-पत्नी फार कमी वेळा घरातून बाहेर पडायचे. तसेच कोणाशी जास्त बोलायचे देखील नाहीत. बुधवारी दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. त्यानंतर घरातून मोठमोठ्याने भांडणाचा आवाज येत होता. पण अचानक काही वेळाने आवाज येणं बंद झालं. रोजच भांडण होत असल्याने शेजाऱ्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. काही वेळाने मुकेश घराबाहेर गेला व जवळपास 20 मिनिटांनंतर परतला. थोडा वेळ गेल्यानंतर तो मोठं पोतं घेऊन घराबाहेर निघाला.
पोतं खालून फाटलं आणि जेनिफरचा हात पडला बाहेर
स्कूटीवर ते पोतं ठेवलं. परंतु घाईघाईमध्ये पोतं खालून फाटलं व त्यातून जेनिफरचा एक हात बाहेर पडला, केसही दिसले. हा भयंकर प्रकार पाहताच शेजारच्यांचा अंगावर काटा आला. मुकेश ते पोतं घेऊन पसार झाला. तोपर्यंत शेजाऱ्यांनी सर्व प्रकार पोलिसांना कळवला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीत प्रचंड वाद झाला. दोघे एकमेकांवर जोरजोरात ओरडत होते. जेनिफरने तिच्या आई-वडिलांना सर्व सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन मुकेशने चाकूने भोसकून जेनिफरचा निर्घृण खून केला. जेनिफरच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या आहेत.
हुंड्याची मागणी करून जेनिफरचा छळ
मुकेशनं अतिशय विकृत पद्धतीने पत्नीची हत्या केल्याचं पोलीस महानिरीक्षक रुपिंदरसिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुकेश हा हुंड्याची मागणी करून जेनिफरचा छळ करत होता, अशी तक्रार जेनिफरच्या भावाने केली आहे. मुकेशच्या आईवडिलांना दोघांचं लग्न मान्य नव्हतं त्यामुळे ते दोघं लग्नानंतर वेगळे राहत असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. मुकेशला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने त्यानंतर पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"