अक्षयनेच काढला करणचा काटा; औरंगाबाद कारागृहात शिजला कट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:40 PM2021-06-24T19:40:19+5:302021-06-24T19:42:17+5:30

Smuggling Case : नागपूर, बाभूळगाव, यवतमाळ येथील साथीदारांच्या मदतीने करणचा गोळ्या घालून निर्घृण खून केला, अशी तक्रार अक्षयची बहीण व करणची पत्नी आभा परोपटे हिने दिली आहे.

Akshay removed the thorn of Karan; plant cut in Aurangabad jail | अक्षयनेच काढला करणचा काटा; औरंगाबाद कारागृहात शिजला कट

अक्षयनेच काढला करणचा काटा; औरंगाबाद कारागृहात शिजला कट

googlenewsNext
ठळक मुद्देअक्षय राठोड व त्याचा बहीणजावई करण रणजित परोपटे यांनी रेतीच्या व्यवसायात गुंतवणूक केली.

यवतमाळ : गुन्हेगारी जगतात कुणी कुणाचा नसतो, याचा प्रत्यय बुधवारी रात्री झालेल्या हत्याकांडातून पुन्हा एकदा आला. जिवाला जीव देणारा सहकारी असलेला बहीणजावई करण परोपटे याचा कुख्यात अक्षय राठोडने काटा काढला. औरंगाबाद कारागृहातून त्याने हत्येचा कट रचला.

नागपूर, बाभूळगाव, यवतमाळ येथील साथीदारांच्या मदतीने करणचा गोळ्या घालून निर्घृण खून केला, अशी तक्रार अक्षयची बहीण व करणची पत्नी आभा परोपटे हिने दिली आहे. अक्षय आत्माराम राठोड, आशीष ऊर्फ बगिरा दांडेकर (वय ३०), शुभम बघेल (२५), धीरज ऊर्फ बेंड, गौरव गजबे, प्रवीण ऊर्फ पी. के. केराम (सर्व रा. यवतमाळ), दिनेश तुरकाने (रा. बाभूळगाव), कल्या ऊर्फ नीतेश मडावी, दिलीप ठवकर, अर्जुन भांजा (सर्व रा. दिघोरी नाका, नागपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अक्षय राठोड व त्याचा बहीणजावई करण रणजित परोपटे यांनी रेतीच्या व्यवसायात गुंतवणूक केली. बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटावर अनभिषिक्त साम्राज्य उभे केले. त्यांच्या परवानगीशिवाय कुणीही येथे रेतीचा उपसा करू शकत नव्हता. या व्यवसायातून पोलिसांचा ससेमिरा कमी व उत्पन्न अधिक, आर्थिक लाभ अधिक, यामुळे काही दिवसांतच आर्थिकदृष्ट्या तुटलेल्या अक्षयची भरभराट झाली. करण परोपटे याची अक्षयकडे ऊठबस होती. यातून करणचे व अक्षयची बहीण आभा यांचे प्रेमसंबंध जुळले. अक्षयच्या विरोधात जाऊन आभाने करणसोबत लग्न केले. येथूनच अक्षय व करणमध्ये दुरावा वाढायला सुरुवात झाली. मात्र, तरीही अक्षय अनेक गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर त्याच्या जामिनासाठी करणने वारंवार प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वी पुणे येथून मोक्काच्या गुन्ह्यात अक्षय राठोडला यवतमाळ पोलिसांनीअटक केली. त्याची औरंगाबाद कारागृहात रवानगी करण्यात आली. रेतीचे साम्राज्य आता एकटा करण परोपटेच हडप करेल, असा संशय निर्माण करण्यात आला. यात बगिरा व त्याचे इतर साथीदार यशस्वी झाले. त्यांनी कारागृहात असलेल्या अक्षयची औरंगाबाद येथे जाऊन भेट घेतली. तेथेच करणचा काटा काढण्याचा बेत आखण्यात आला. संधी मिळताच स्टेट बँक चौकात धारदार शस्त्राने व गोळ्या झाडून बुधवारी रात्री करण परोपटेची हत्या करण्यात आली. यामुळे बाभूळगाव धामणगाव मार्गावरील गुन्हेगारीचा सारीपाट पुन्हा बदलला आहे. आता नव्याने एन्ट्री कुणाची यावर अनेकांची नजर लागली आहे. 

अनिकेतशी सलगी खटकली 

करण परोपटे, अनिकेत गावंडे व अक्षयची मोठी बहीण आशा मोरे, आभा परोपटे हे सोबत जेवण करायला गेले होते. ५ जून रोजी यावरून बगिरा व त्याच्या इतर साथीदारांनी वाद घालत आशा मोरे हिला धमकी दिली होती. यात करणने मध्यस्थी करून वाद सोडविला होता. तेथूनच करणवर पाळत ठेवली जात होती.


 करणला गुन्हेगारांची संगत भोवली
यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारांच्या प्रतिमा जाणीवपूर्वक आयकाॅनप्रमाणे समाजापुढे आणल्या जातात. याला अल्पवयीन मुले भुरळतात. अशीच भुरळ बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती या छोट्याशा गावात राहणाऱ्या करण रणजित परोपटे याला पडली. तो कुख्यात अक्षय राठोड याच्या संपर्कात आला. भाऊचा प्रभाव त्याच्यावर पडला. करणने स्वत:हून कुठलाही गुन्हा केलेला नाही. मात्र, दहशतीच्या साम्राज्याची त्यालाही चटक लागली. यातून तो गुन्हेगारीच्या दलदलीत फसत गेला. अखेर त्याच विश्वात ज्यांच्या साथीने त्याने पदार्पण केले, त्यांनीच त्याचा घात केला. गुन्हेगाराचा शेवट हा अतिशय निदर्यीपण होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. 

बुधवारी दुपारपासूनच करणवर पाळत

आपल्या हत्येचा कट रचला गेला आहे, अशी पूर्वकल्पना करण परोपटे याने पत्नी आभाला दिली होती. बुधवारी दुपारी १ वाजतापासून गौरव गजबे, प्रवीण केराम हे चांदोरेनगर स्थित घरावर पाळत ठेवून हाेते. करण परोपटे हा रोशन गोळे व आणखी एका साथीदारासह स्टेट बँक चौकात तलाठ्याला भेटण्यासाठी गेला असता त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

एलसीबीच्या पथकाने दोघांना घेतले ताब्यात

अक्षय राठोडच्या अटकेनंतर त्याच्या सहकाऱ्यांमध्ये कुरबुर सुरू झाली. परस्पराविषयी अविश्वास व संशय वाढत गेला. सुरुवातीला अक्षयचा विश्वासू असलेला अनिकेत गावंडे व रोशन गोळे उर्फ लॅपटाॅप हे बाजूला झाले. बहिणीशी लग्न होऊन कौटुंबिक सदस्य बनलेल्या करणला त्यामुळे वाव मिळाला. मात्र करणचे अनिकेत व रोशन गोळे यांच्यासोबतही मित्रत्वाचे संबंध होते, हीच बाब त्याच्यासाठी घातक ठरली. 

या टोळीत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचा सुगावा पोलिसांपर्यंत होता. ॲक्शन न झाल्याने रिॲक्शन दिल्या गेली नाही. खुनाच्या घटनेनंतर एलसीबीच्या पथकाने गुरुवारी पहाटे धीरज उर्फ बेंड आणि दिनेश तुरकाने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी कट्टाही हस्तगत झाल्याची माहिती आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत बोलणे टाळले.

Web Title: Akshay removed the thorn of Karan; plant cut in Aurangabad jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.