दारुच्या नशेत तिघांवर चाकूने हल्ला, एकाची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 09:27 PM2019-01-23T21:27:22+5:302019-01-23T21:29:19+5:30
कळंगुटचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी मध्यरात्री १.१५ वा. सुमाराला घडली.
म्हापसा - कळंगुट येथील एका हॉटेलात सुरु असलेल्या पार्टीत दारुच्या नशेत एका मित्राने त्याच्या सोबत असलेल्या इतर तिघा मित्रांवर चाकूने खूनी हल्ला करुन जखमी करण्याची घटना घडली आहे. जखमींतील एकाची स्थिती चिंताजनक असून सर्वांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
कळंगुटचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी मध्यरात्री १.१५ वा. सुमाराला घडली. कळंगुट-बागा रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात चौघे मित्र पार्टी करण्याच्या निमित्ताने दारुचे प्राशन करीत एकत्रीत बसले होते. पार्टी सुरु असताना त्यांच्यात सुरुवातीला किरकोळ वादावादी सुरु झाली. या वादावादीचे पर्यावसान खूनी हल्ल्यात झाले. त्यात संशयित मंजूनाथ काडलीकोप्पा (म्हापसा, मूळ कर्नाटक) याने अचानपणे आक्रमक होत इतर तिघांवर चालूने वार करण्यात सुरुवात केली. अचानकपणे सुरु झालेल्या या प्रकारातून सर्वजण हादरून गेले. एकच धावपळ सुद्धा सुरु झाली.
मंजूनाथ काडलीकोप्पाने केलेल्या हल्ल्यात सागर राठोड (कळंगुट), उमेश चव्हाण (म्हापसा) तसेच कृष्णा राठोड (साळगाव) हे जखमी झाले. जखमीतील सागर राठोड याच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आले असल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. इतर दोघांबरोबर त्यालाही उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. इतर दोघांची प्रकृती मात्र स्थिर तसेच चिंताजनक नसल्याने निरीक्षक दळवी यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले. संशयीत मंजूनाथ काडलीकोप्पा याला घटनास्थळी अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी पंचनामा करुन महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेवून प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. उपनिरीक्षक प्रजीत मांद्रेकर निरीक्षक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.