नागपुरात तस्करीत अडकला दारु व्यावसायिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:53 PM2020-01-29T23:53:45+5:302020-01-29T23:55:28+5:30
गुन्हे शाखा पोलिसांनी मेयो हॉस्पिटल चौकातील दारू विक्रेता अशोक वझानीच्या दारू तस्करीचा भंडाफोड केला आहे. पोलिसांनी वझानीच्या मदतीने दारूची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना रंगेहात पकडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी मेयो हॉस्पिटल चौकातील दारू विक्रेता अशोक वझानीच्या दारू तस्करीचा भंडाफोड केला आहे. पोलिसांनी वझानीच्या मदतीने दारूची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून दारू आणि स्कॉर्पिओसह ५.८५ लाखाचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे तस्करी करणाऱ्या दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
रमेश मारोतराव भुते (४२) रा. नेताजीनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याला दारूचा पुरवठा करणाºया अशोक लखाराम वझानीलाही आरोपी बनविण्यात आले आहे. वझानी यांचे मेयो हॉस्पिटल चौकात चंद्रलोक बिल्डींगमध्ये वाईन शॉप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वझानी अनेक दिवसांपासून शहरातील अवैध दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करतात. वझानीची पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागात ओळख आहे. यामुळे त्याच्यावर कारवाई होत नव्हती. गुन्हे शाखेच्या झोन चारच्या पथकाला वझानीचा साथीदार रमेश भुते हा नेताजीनगरात दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. बुधवारी सायंकाळी रमेश स्कॉर्पिओ क्रमांक एम. एच. ४०, ए-९०९९ मध्ये दारूच्या १३ पेट्या घेऊन नेताजीनगरच्या गायत्री कॉलनीत पोहोचला. पोलिसांनी धाड टाकून रमेशला पकडले. स्कॉर्पिओची तपासणी केली असता त्यात दारूच्या १३ पेट्या आढळल्या. रमेशने ही दारू वाईन शॉपमधून खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी लगेच वाईन शॉप गाठले. कारवाईची माहिती मिळताच वझानी फरार झाला. पोलिसांनी ८५ हजाराची दारू आणि ५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ जप्त केली आहे. वझानीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे दारू व्यावसायिकात खळबळ उडाली आहे. मेयो हॉस्पिटल चौक अनेक दिवसापासून दारू तस्करीचा अड्डा झाला आहे. ‘लोकमत’ने वेळोवेळी याचा खुलासाही केला आहे. दोन महिन्यापूर्वी झोन पाचच्या पथकाने मेयो हॉस्पिटल चौकातून कारमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या युवकाला यशोधरानगरात पकडले होते. दारूची तस्करी आणि ग्राहकांद्वारे रस्त्यावर दारू घेण्यात येत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांनी अनेकदा पोलिसांना तसेच उत्पादन शुल्क विभागाला तक्रार देऊनही कारवाई होत नव्हती. आरोपींविरुद्ध दारू प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक मसराम, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन, उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, हवालदार देवेंद्र चव्हाण, सुधाकर धंदर, कृपाशंकर शुक्ला, प्रशांत कोडापे, सचिन तुमसरे, बबन राऊत यांनी केली.