रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:08 AM2020-05-15T03:08:59+5:302020-05-15T03:09:23+5:30
बोरिवली येथील एका रुग्णवाहिकेतून दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
नालासोपारा : एका रुग्णवाहिकेतून चक्क दारूची तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तुळिंज पोलिसांनी उघड केला आहे. दोन आरोपींना तुळिंज पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली येथील एका रुग्णवाहिकेतून दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नालासोपारा पूर्वेकडील सीताराम बाप्पा मार्केटजवळ एका रुग्णवाहिकेला विदेशी दारू घेऊन जाताना पकडले.
पोलिसांनी दत्ता गणपत राठोड (३२) आणि रवी लक्ष्मण राठोड (२८) या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १२ हजार ८८० किमतीच्या डीएसपी ब्लॅक व्हिस्कीच्या ९२ बाटल्या आणि आयबी व्हिस्कीच्या १३ हजार ६०० रुपये किमतीच्या ९६ बाटल्या जप्त केल्या. तसेच त्यांच्या गाडीसह तब्बल तीन लाख २६ हजार ३२० किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.