दारूच्या व्यसनाने केला घात; डोक्यावर काठीने घाव घालून पत्नीने केली पतीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 09:10 PM2021-02-17T21:10:05+5:302021-02-17T21:10:33+5:30
Murder :दोघेही शेतमजुरी करायचे व सोबतच मद्यपान करायचे. त्यातून नेहमीच त्यांच्यात कलगीतुरा उडत असल्याचे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले.
बेनोडा (शहीद) (अमरावती) : नजीकच्या पळसोना गावात मद्यपी पत्नीने मद्याधीन पतीवर काठीचा प्रहार केला. डोक्यावर मार लागल्याने त्याचा झोपेतच मृत्यू झाला. हत्येची ही घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी उजेडात आली. पोलीस सूत्रांनुसार, दसरी साहेबराव उईके (४३, रा. पळसोना) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. साहेबराव गोमाजी उईके (४८) असे मृत पतीचे नाव आहे. त्या दोघांनाही दारुचे व्यसन होते. दोघेही शेतमजुरी करायचे व सोबतच मद्यपान करायचे. त्यातून नेहमीच त्यांच्यात कलगीतुरा उडत असल्याचे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले.
१६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास मद्यपानानंतर त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोघेही एकमेकांना मारत होते. शेजा०यांनी नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले. दसरीने काठीने साहेबराववर प्रहार केले. काही वेळाने वाद मिटला व दोघेही झोपी गेले. सकाळी साहेबराव उठत नव्हता. त्याचा झोपेतच मृत्यू झाला. काठीचे प्रहार डोक्यावर लागल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. घटनेची माहिती मिळताच बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
प्राथमिक माहितीवरून दसरीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मिलिंद सरकटे, हेडकॉन्स्टेबल अनिल भोसले, सुदाम साबळे, दिवाकर वाघमारे, गजानन कडू, सचिन भोसले, मंदा सावरकर, उत्तरा पांडे करीत आहेत.
शेजा-यांसाठी नेहमीचेच भांडण
उईके दाम्पत्याचा विवाह १६ वर्षांपूर्वी झाला. त्यांना १४ व १२ वर्षांच्या दोन मुली आहेत. ते दोघेही सोबत कामावर जायचे आणि सोबतच दारू ढोसायचे. त्यातून त्यांचे वादही व्हायचे. मात्र, दररोजच्या या पती-पत्नीच्या वादात कुणी हस्तक्षेप करीत नव्हते.