बंटी बबली सापडले; पुण्यातून येऊन ते करायचे मोटार सायकल चोरी
By राजेश भोस्तेकर | Published: April 20, 2023 08:12 PM2023-04-20T20:12:42+5:302023-04-20T20:12:49+5:30
महिला सोबत असेल तर पोलीस तपासणी करत नाहीत असा समज करून तो गर्लफ्रेंडला घेऊन मोटरसायकल चोऱ्या करायचा
अलिबाग : चागल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी असताना घराचे कर्ज डोक्यावर होते. अशातच एका महिलेशी प्रेम संबंध जोडून कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी आणि ऐशो आराम जीवन जगण्यासाठी त्या दोघांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले. यातून बंटी आणि बबलीने २ लाख १३ हजाराच्या दहा मोटार सायकलवर हात साफ केले. अखेर रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून बंटी आणि बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
आरोपी विक्रम राम कालेकर, वय. 36, मूळ राहणार लाडवली हा पुणे रांजणगाव येथील एमआयडीसीमध्ये समसंग कंपनीत ४० हजार पगाराची नोकरी करीत होता. पुणे येथे कर्जावर घर घेतले होते. आरोपी अनुराधा विवेक दंडवते, वय.31, रा. रा. यशवंतनगर, खराडी, पुणे, मूळ रा.75/4, पर्वती पायथा, स्वारगेट ,पुणे हिच्याशी विक्रम याचे प्रेम सबंध होते. घराचे झालेले कर्ज फेडण्यासाठी आणि एशो आराम जीवन जगण्यासाठी चोरी करण्याचा प्लॅन दोघांनी केला. कंपनीतून सुट्टीच्या दिवशी त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊन पेण आणि रसायनी या पोलीस स्टेशन हद्दी मधून मोटरसायकल चोरीचे गुन्हे हे दोघे बंटी बबली करायचे.
महिला सोबत असेल तर पोलीस तपासणी करत नाहीत असा समज करून तो गर्लफ्रेंडला घेऊन मोटरसायकल चोऱ्या करायचा. ज्या परिसरात चोरी करायचे आहे त्या परिसरात फिरून ज्या मोटरसायकलला चावी आहे अशी मोटरसायकल चोरी करून पसार व्हायचे. पेण, रसायनी, खांदेश्वर याठिकाणी त्यांनी मोटार सायकल चोरल्या आहेत. या बंटी बबली चा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे पथकाने शोध सुरू केला होता. यासाठी सीसीटिव्ही च्या आधारे तपास सुरू केला. पोलीस हवालदार राकेश म्हात्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदार नुसार पथकाने रसायनी येथे सापळा रचला होता. त्यानुसार आरोपी विक्रम कालेकर याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस खाक्या दाखविल्यानंतर दोघांनी गुन्हा कबूल केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश कदम, सहाय्यक पोलीस अधिकारी कोरम, पोह मोरे, पोह झेमसे, पोह राजा पाटील,पोह सावंत, पोह म्हात्रे, मपोशी. चव्हाण तसेच सायबर विभागाचे पोनातुषार घरात व पोनाअक्षय पाटील यांनी यशस्वी कारवाई केली आहे.