अपघातात मृत्यू...कुत्रे लचके तोडत राहिले, पोलीस पोहोचलेच नाहीत, व्हिडिओ रेकॉर्ड करणारे लटकणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 11:46 AM2022-12-07T11:46:55+5:302022-12-07T11:48:09+5:30
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये पोलिसांचा निष्काळजीपणाचं एक भयंकर प्रकरण उघडकीस आलं आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये पोलिसांचा निष्काळजीपणाचं एक भयंकर प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे राष्ट्रीय महामार्ग ९१ वर आक्रााबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पणती चौकीजवळ एक अपघात झाला. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली, मात्र तासभरही पोलीस आपली चौकी सोडून २०० मीटर अंतरावर असलेल्या घटनास्थळावर पोहोचले नाहीत. दरम्यान, कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडण्यास सुरुवात केल्यावर काही व्यक्तींनी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला.
व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस दलात खळबळ उडाली. आता पोलीस व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग ९१ वर पाणेठी चौकीजवळ दाट धुके होते. त्यामुळे जवळ असलेले लोकही दिसत नव्हते. दरम्यान, वाहनाची धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र तासभरही अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या चौकीतून पोलीस पोहोचू शकले नाहीत. यादरम्यान कुत्रे आले आणि मृतदेहाचे लचके तोडू लागले. हे पाहून एका व्यक्तीनं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
सोशल मीडियात पोलिसांवर जोरदार टीका
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक पोलिसांविरोधात कमेंट करत आहेत. याला पोलिसांचा निष्काळजीपणा म्हणत उत्तर प्रदेश सरकारकडे कारवाईची मागणी केली. अलिगडच्या एसएसपींनी स्वत: या व्हिडिओची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, अत्यंत किळसवाणा प्रकार घडल्यानंतर आता पोलिसांनी ज्या व्यक्तीनं व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला त्याचा शोध सुरू केला आहे.
भटक्या कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके
मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्यांनी संपूर्ण मृतदेहाचे लचके तोडले आहेत. सुमारे तासभर कुत्र्यांनी मृतदेह ओरबाडला. काही लोकांनी कुत्र्यांना हाकलण्याचाही प्रयत्नही केला, मात्र मृतदेह काही वेळ ओरबाडल्यानंतर कुत्रे हिंसक झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्यांनी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केल्याचे सांगितलं जात आहे.