तिघेही भारतात राहिले, प्रेम मात्र पाकिस्तानवर केले : कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 10:20 AM2023-07-18T10:20:44+5:302023-07-18T10:21:09+5:30

लष्करी तळांची गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी तिघांना जन्मठेप

All three stayed in India, but fell in love with Pakistan: Court | तिघेही भारतात राहिले, प्रेम मात्र पाकिस्तानवर केले : कोर्ट

तिघेही भारतात राहिले, प्रेम मात्र पाकिस्तानवर केले : कोर्ट

googlenewsNext

अहमदाबाद : हेरगिरी तसेच भारताच्या लष्करी तळांची गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला दिल्याच्या आरोपाखाली गुजरातमधील सत्र न्यायालयाने सोमवारी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांच्या न्यायालयाने फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळून लावली. या तिघांनी केलेला गुन्हा “दुर्मिळातील दुर्मीळ” श्रेणीत येत नाही, असे कोर्टाने यावेळी म्हटले.
भारतात बसून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या व्यक्तींनी स्वेच्छेने भारत देश सोडावा, अन्यथा सरकारने त्यांचा शोध घेऊन त्यांना पाकिस्तानात पाठवावे, असे कोर्टाने यावेळी म्हटले.

या तिघांच्या कृत्याने भारताच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला हानी पोहोचली. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य वाढते. भारतीय नागरिक असूनही, त्यांनी पाकिस्तानच्या फायद्याचा विचार केला. त्यांनी भारताच्या १४० कोटी जनतेच्या सुरक्षेचा विचार केला नाही. त्याऐवजी त्यांनी स्वतःचा फायदा आणि पाकचे हित पाहिले, असे कोर्टाने म्हटले. तीन आरोपींपैकी दोघे अहमदाबादच्या जमालपूरचे रहिवासी तर नौशाद अली हा राजस्थानमधील जोधपूरचा आहे. देशात राहून देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना कमी शिक्षा देणे हेही देशविरोधी कृत्य मानले जावे, असे न्यायमूर्तींनी यावेळी नमूद केले. गुजरात आणि केंद्रानेही या तिघांवर खटला चालवण्यास होकार दिला होता. 

देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप
न्यायालयाने सिराजुद्दीन अली फकीर (वय २४), मोहम्मद अयुब (२३) आणि नौशाद अली (२३) यांना भारतीय दंड संहिता (आयपीसी), गुन्हेगारी कट रचणे आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली २०१२ मध्ये अटक केली होती. हे सर्वजण पाकिस्तानला भारताची गोपनीय माहिती ई-मेल्सद्वारे पुरवत होते.

दुबईतून लाखो रुपये मिळविले
सर्व आरोपी भारताचे नागरिक असून त्यांच्यात पाकिस्तानबद्दल प्रेम, आपुलकी आणि देशभक्ती आढळली. त्यामुळे त्यांनी भारतीय लष्कराच्या हालचालींची गुप्त माहिती पाकिस्तानातील आयएसआयला सलग तीन वर्षे पाठवली आणि दुबईतून लाखो रुपये मिळवले, असे कोर्टाने म्हटले.

Web Title: All three stayed in India, but fell in love with Pakistan: Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.