NCB : पंच साक्षीदाराच्या आरोपामुळे एनसीबीच्या विश्वासार्हतेला तडा? वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा साईल याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:52 AM2021-10-25T06:52:03+5:302021-10-25T06:52:48+5:30
NCB : एनसीबीच्या छाप्यात क्रमांक एकचे पंच असलेले साईल यांनी प्रतिज्ञापत्रात सर्व घटनाक्रम, वेळ व ठिकाणानीशी नमूद केले आहे. जिवाला धोका असल्याने मी परिचिताकडे सोलापूरला १०-१२ दिवस राहिलो, असे त्यांनी नमूद केले.
- जमीर काझी
मुंबई : पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने केलेल्या गंभीर आरोपामुळे सध्या संपूर्ण देशात चर्चेत असलेल्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. वानखेडे यांना आठ कोटी देण्याच्या बोलीबरोबरच त्यांनी पंचाकडून कोऱ्या कागदपत्रावर स्वाक्षरी घेतल्याचा आरोप गंभीर आहे, कोर्टासमोर तो मांडला गेल्यास या केसचे चित्र बदलेल, असे मत कायदेतज्ज्ञांनी मांडले.
एनसीबीच्या छाप्यात क्रमांक एकचे पंच असलेले साईल यांनी प्रतिज्ञापत्रात सर्व घटनाक्रम, वेळ व ठिकाणानीशी नमूद केले आहे. जिवाला धोका असल्याने मी परिचिताकडे सोलापूरला १०-१२ दिवस राहिलो, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी म्हटले आहे की, छाप्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवले. एनसीबीच्या कारवाईवेळी अधिकारी, मी, गोसावी व मनीष भानुशाली हे टर्मिनल्सवर होतो. अन्य कोणीही पंच त्यावेळी तेथे नव्हते. त्यावेळी मी गोसावीचे चोरून लपून व्हिडिओ शूट केले. त्यात तो आर्यनला मोबाइलवर बोलायला लावत होता.
मी, किरण गोसावी आणि मनीष भानुशाली हे बाहेरचे लोक होतो. क्रूझवर कारवाईदरम्यान किरण गोसावी, वानखेडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. ११.३० वाजता मी बोर्डिंग होते तिथे गेलो. तेव्हा मी आर्यन खानला केबिनमध्ये बसलेले बघितले. एनसीबी कार्यालयात जेव्हा पावणेबाराला सगळ्यांना आणले, तेव्हा पंचाचा साक्षीदार म्हणून मला सही करायला एनसीबी कार्यालयात वर बोलावले. तिथे साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्याने कोऱ्या पेपरवर सह्या करायला लावल्या. मी याबाबत किरण गोसावींकडे कोऱ्या पेपरवर कशी सही करू, असे विचारले तेव्हा समीर वानखेडे तिथे आले. त्यांनी काय नाही होत, तू कर सह्या, असे सांगितल्यावर मी सह्या केल्या. मला ९ ते १० कोऱ्या पेपरवर सह्या करायला लावल्या. माझे आधार कार्ड मी त्यांना व्हॉट्सॲप केले. पंच म्हणून माझी सही घेतली तेव्हा कागद कोरे होते, असे साईल यांनी सांगितले.
कोण आहे प्रभाकर साईल?
साईल हा किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड म्हणून काम करत असून, कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी मुलाला घेऊन स्वतंत्र राहते. त्यामुळे तो गोसावींकडेच राहत होता. कारवाईनंतर दोन दिवस मोबाइल बंद करून ठेवण्यास सांगितले होते. त्याने त्याचा पगार थकविला होता, तो मिळवण्यासाठी त्याचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता असे त्याने म्हटले आहे.
साईल यांनी सांगितले की, मी किरण गोसावींसोबतच होतो. तो एनसीबी ऑफिसमध्ये गेला. मी खालीच थांबलो होतो. ते बरोबर सव्वाबाराला खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊन फ्रॅंकी, शीतपेय घेऊन ग्रीन गेटला गेलो. आतमध्ये वानखेडे, त्यांचे सहकारी बसले होते तिथे त्यांना फ्रॅंकी, पाणी आणि आणलेले शीतपये दिले. नंतर क्रूझच्या बाहेर गेलो. तिथून मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितले. मला काही फोटो दाखवण्यात आले होते व ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितले होते. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचे होते.
क्रूझवर घेऊन जायला एक बस होती. त्यातून कोण जातं त्याला ओळखायला सांगितले होते. २७०० नंबरच्या बसमध्ये फोटोमधली एक व्यक्ती बसली त्यालाच मी ओळखले. बाकीच्यांना ओळखले नाही, कारण सर्वांनीच मास्क घातले होते. ४.२९ वाजता मला दिलेल्या फोटोमधील १३ व्यक्ती आल्या आहेत असा मेसेज दिला. आर्यन खान माझ्यासमोरच आले होते. त्यांना घ्यायला बस नाही तर क्रूझवरची व्हीआयपी गाडी आली होती.