नागपुरात कथित बिल्डर मित्राने केली दगाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 09:04 PM2020-02-06T21:04:53+5:302020-02-06T21:06:46+5:30
एका प्राध्यापिकेशी ऑनलाईन मैत्री करत तिचा विश्वास संपादन करणाऱ्या एका कथित बिल्डरने तिच्याकडून ६४ हजार रुपये लंपास केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका प्राध्यापिकेशी ऑनलाईन मैत्री करत तिचा विश्वास संपादन करणाऱ्या एका कथित बिल्डरने तिच्याकडून ६४ हजार रुपये लंपास केले. तीन दिवसात पैसे परत करण्याची थाप मारणारा आरोपी दोन महिने होऊनही रक्कम परत करत नसल्याचे पाहून प्राध्यापिकेने त्याची पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर तो बिल्डर नाही तर थापेबाज असल्याचे उघड झाले.
प्रणय दत्तराम नारनवरे असे आरोपीचे नाव आहे. मूळची वर्धा आणि सध्या नागपुरातील ओमकारनगरात राहणारी रोशनी (वय २९) एका महाविद्यालयात नोकरी करते. तिच्यासोबत आरोपीची गेल्या वर्षी जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर भेट झाली. दोघांचा नंतर ऑनलाईन संपर्क वाढला. नारनवरे स्वत:ला बिल्डर असल्याचे सांगत होता. सातत्याने संपर्क होत असल्याने या दोघांमध्ये मैत्री झाली. दरम्यान, रोशनीचा विश्वास संपादन करणाऱ्या नारनवरेने २८ नोव्हेंबर २०१९ ला अचानक रोशनीला फोन करून ६४ हजाराची गरज असल्याचे सांगितले. तीन दिवसात रक्कम परत करेन, असेही तो म्हणाला. त्यानुसार रोशनीने आधी ३० हजार ऑनलाईन ट्रान्सफर केले, नंतर पुन्हा ३४ हजार पाठविले. काही दिवसानंतर रोशनीने त्याला पैसे परत मागितले असता आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. दोन महिने होऊनही तो रक्कम परत करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने रोशनीला संशय आला. तिने त्याच्याबाबत माहिती काढली असता तो बिल्डर नसून थापेबाज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रोशनीने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली नारनवरेविरुद्ध गुन्हा दाखल केला. एपीआय संतोष जाधव पुढील तपास करीत आहेत.