अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी अमरेंद्र मिश्राला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 06:48 IST2024-02-11T06:48:01+5:302024-02-11T06:48:28+5:30
अमरेंद्रने भाईंदर पोलिसांकडे जमा केलेला शस्त्रपरवाना खरा आहे की नाही, याची पडताळणी करायची आहे, असे पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले.

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी अमरेंद्र मिश्राला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाशी संबंधित आरोपी अमरेंद्र मिश्रा याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाने शनिवारी १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अमरेंद्र मिश्रा तीन महिन्यांपूर्वीच मॉरिसचा वैयक्तिक सुरक्षारक्षक म्हणून सेवेत रुजू झाला. पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली. अमरेंद्र हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. मुंबई पोलिसांनी अमरेंद्रला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्याची विनंती दंडाधिकाऱ्यांना केली.
अमरेंद्रने भाईंदर पोलिसांकडे जमा केलेला शस्त्रपरवाना खरा आहे की नाही, याची पडताळणी करायची आहे, असे पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने आपल्याला शस्त्रपरवाना दिला आहे, असे मिश्राचे म्हणणे आहे. त्याशिवाय बंदुकीच्या बदल्यात मॉरिसने अमरेंद्रला काही पैसे दिले होते का? ही बाब पडताळायची आहे. अमरेंद्रने त्याच्या परवान्याची नोंद मुंबई पोलिसांकडे का केली नाही? तसेच त्याने त्याचे वेतन व अन्य बाबींची नोंद पोलिसांकडे का केली नाही? याची चौकशी करायची आहे, असे पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, दंडाधिकाऱ्यांनी अमरेंद्रला सात दिवसांची पोलिस कोठडी न सुनावता १३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.