पंतप्रधानांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त, तरीही चोरट्यांनी भर वस्तीतून एटीएम पळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 02:51 PM2024-05-05T14:51:02+5:302024-05-05T14:51:35+5:30
शनिवारी मध्यरात्री चोरटयांनी ही मशीन लंपास केल्याचे कळते.
अंबाजोगाई : अंबाजोगाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा बंदोबस्त असतानाही भर वस्तीतून चोरट्यांनी एटीएम मशीन उचलून नेण्याचा खळबळ जनक प्रकार शनिवारी मध्यरात्री नंतर घडला.
गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असताना आता तर चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.५) सकाळी समोर आला आहे. शनिवारी मध्यरात्री चोरटयांनी ही मशीन लंपास केल्याचे कळते. मंगळवारी (दि.५) शहारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून या सभेच्या अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर ही घटना घडली आहे.
अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात 'इंडिया १' कंपनीचे खाजगी 'एटीएम' आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या 'एटीएम' वर दरोडा घालत चक्क 'एटीएम' मशीनचं लंपास केले आहे. दरम्यान, या 'एटीएम' मध्ये संबंधित बँकेची किती कॅश होती ? ते अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी 'झाले असून घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, अंबाजोगाई शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे.