अंबरनाथ पालिकेच्या कर निरीक्षकाला ५० हजारांची लाच घेताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 04:43 PM2020-12-22T16:43:01+5:302020-12-22T16:43:14+5:30
Crime News: देवसिंग पाटील हे अंबरनाथ पालिकेचे लिपिक असून त्यांच्याकडे कर विभागाच्या निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या कर विभागातील निरीक्षक देवसिंग पाटील यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलीय. अंबरनाथ पालिकेतच हा सापळा रचण्यात आला.
देवसिंग पाटील हे अंबरनाथ पालिकेचे लिपिक असून त्यांच्याकडे कर विभागाच्या निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. अंबरनाथ पश्चिमेतील एका टॅक्सच्या प्रकरणात त्यांनी तक्रारदारकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केल्यानंतर ५ दिवसांपूर्वी पाटील यांच्यावर सापळा रचण्यात आला, मात्र तो यशस्वी झाला नाही. अखेर आज पुन्हा एकदा सापळा रचल्यानंतर पाटील यांनी लाच स्वीकारली आणि ते पकडले गेले.
मात्र आपल्यावर सापळा लागल्याचं लक्षात येताच त्यांनी हे पैसे फेकून दिले. त्यामुळे पैसे सापडत नसल्यानं अँटी करप्शन अधिकाऱ्यांनी देवसिंग पाटील यांना पोलिसी प्रसाद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर पैसे हस्तगत करून पाटील यांच्यावर पुढील कारवाई सुरू करण्यात आली असून कर विभागात कुणालाही जाण्यास मनाई करण्यात आलीय.