अमेरिका ते न्यूझीलंड...व्हाया नागपूर; ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, पाच कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 06:36 AM2022-08-09T06:36:20+5:302022-08-09T06:36:29+5:30
पाच कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त
मुंबई : पोलिसांनी केलेल्या कारवाईतून ड्रग्ज तस्करीचे नागपूर कनेक्शन समोर आले असतानाच, अमली पदार्थ नियंत्रक पथकाच्या (एनसीबी) कारवाईतून पुन्हा एकदा नागपूरचे ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे. अमेरिका, न्यूझीलंड ते नागपूरला कुरिअरद्वारे निघालेले कोट्यवधींचे ड्रग्ज पार्सल जप्त करण्यास एनसीबीला यश आले आहे. गेले ६ दिवस सुरू असलेल्या कारवाईअंती एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई केली. जवळपास ५ कोटींचे ड्रग्ज जप्त करत तीनजणांना ताब्यात घेतले आहे.
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने सलग ६ दिवस राबविलेल्या ३ ऑपरेशनअंतर्गत ४.५९० किलो मेथाक्वॅलोन, ८७० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, ८८ किलो उच्च प्रतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास ५ कोटी आहे. यामध्ये मुंबईच्या फॉरेन पोस्ट ऑफिस येथून हायड्रोपिनिक गांजाचे पार्सल जप्त करण्यात आले.
हे पार्सल अमेरिका येथून नागपूरला जाणार होते. त्यापाठोपाठ दुसऱ्या कारवाईत जप्त करण्यात आलेले मेथाक्वॅलोनचा साठा हा नागपूर येथून न्यूझीलंडला जाणार असल्याची माहिती तपासात समोर आली. पोळपाटात हे ड्रग्ज लपविण्यात आले होते. या दोन्ही कारवाईत नागपूरचे ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आल्यामुळे पुढील तपासासाठी एक पथक नागपूरला रवाना झाले आहे.
८८ किलो गांजा जप्त
त्यापाठोपाठ कर्जत येथून मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी होणार असल्याच्या माहितीने पथकाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचून संशयित वाहन अडवले.वाहनाच्या टायर, दरवाजामध्ये लपवून ठेवलेला ८८ किलो गांजा जप्त करण्यास पथकाला यश आले.
हा गांजा तस्करीसाठी मुंबईत येणार होता. त्यापूर्वीच पथकाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. गेल्या ४ वर्षांपासून ते ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती चौकशीत उघड झाली. प्रत्येक फेरीदरम्यान वाहनांबरोबर त्याचा वाहन क्रमांक बदलून ते ड्रग्जची तस्करी करत होते.