जम्मू-काश्मीरमध्ये जप्त केलेली स्फोटके नागपूरमधील कंपनीची?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 06:09 AM2020-09-26T06:09:52+5:302020-09-26T06:10:03+5:30
अधिकाऱ्यांकडून दुजोरा नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जम्मू-काश्मीरमधील कारेवा गावात गेल्या आठवड्यात लष्कराने जप्त केलेली स्फोटके नागपूरनजीकच्या अमीन एक्सप्लोसिव कंपनीत तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत अधिकृत अशी कोणतीही चौकशी अथवा विचारणा आमच्याकडे करण्यात आली नाही, असे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने या वृत्तावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद काश्मिरातील अवंतीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेवा गावाजवळ कट शिजवत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. त्याआधारे भारतीय लष्कर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी गेल्या आठवड्यात सर्चिंग आॅपरेशन करून कारेवा गावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये लपविलेली ५२ किलो स्फोटके आणि ५० डिटोनेटर जप्त केली. ४१६ पाकिटांमध्ये ही स्फोटके दडवण्यात आली होती. स्फोटकांवर ती नागपूरच्या एक्सप्लोसिव कंपनीत तयार करण्यात आल्याचे लिहून असल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे स्थानिक तपास यंत्रणांनी अमीन एक्सप्लोसिव्ह कंपनीकडे चौकशी केली. मात्र, कंपनी अधिकाºयांनी याबाबत कानावर हात ठेवले. ‘लोकमत’ने कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली याबाबत आमच्याकडे कसलीही माहिती नाही तसेच पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणेतील कोणत्याही अधिकाºयांनी चौकशी केली नाही, असे कंपनीचे मॅनेजर कुमार रंजीत यांनी सांगितले.
कंपनी कनेक्शन
हैदराबाद येथे झालेल्या दहशतवादी स्फोटात अमीन एक्सप्लोसिव कंपनीत तयार झालेले द्रवरूप स्फोटक वापरण्यात आल्याची माहिती आल्याने तपास यंत्रणांनी कंपनीची चौकशी केली होती.
कंपनीतील सेफ्टी फ्यूज युनिट वगळता कंपनी रायपूरचे संजय चौधरी यांना विकल्याचे समजते.