अमोल काळेने आणली मध्य प्रदेशातून शस्त्रे; नालासोपारा स्फोटक प्रकरणातील मुख्य सूत्रधार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 06:09 AM2018-10-13T06:09:30+5:302018-10-13T06:09:44+5:30
नालासोपारा स्फोटके प्रकरणाचा अमोल काळे हा मुख्य सूत्रधार असून, त्याने मध्य प्रदेशातील सेंदवामधून शस्त्र, स्फोटके आणल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी विशेष न्यायालयात देत वाढीव कोठडीची मागणी केली.
मुंबई : नालासोपारा स्फोटके प्रकरणाचा अमोल काळे हा मुख्य सूत्रधार असून, त्याने मध्य प्रदेशातील सेंदवामधून शस्त्र, स्फोटके आणल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी विशेष न्यायालयात देत वाढीव कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने काळेसह तिघांच्या वाढीव पोलीस कोठडीला नकार दिला. तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेत अटक केलेल्या पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील अमोल काळेसह अमित बद्दी, गणेश मेस्कीन यांची कोठडी संपत असल्याने, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. एटीएसने न्यायालयात दिलेल्या माहितीत, नालासोपारा स्फोटके प्रकरणाचा काळे हा मुख्य सूत्रधार आहे. त्याने सनबर्न, तसेच हिंदूविरोधी व्यक्तींविरुद्ध मोहीम छेडली होती. अशा अनेक व्यक्ती त्याच्या निशाण्यावर असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले.
उत्पन्नाचे साधन नसतानाही त्याने मध्य प्रदेशातील सेंदवा गावातून शस्त्र खरेदी केली. मात्र, ती कोणाकडून, तसेच किती रुपयांना विकत घेतली, याबाबत तो माहिती देत नसल्याचे एटीएसने या वेळी नमूद केले. काळेचे एक सोशल अकाउंट हाती लागले आहे. तो त्याचा पासवर्ड देण्यास तयार नाही. आतापर्यंत तपास यंत्रणांनी काळे याच्याकडे केलेल्या चौकशीमुळे त्याला तपासाची दिशा लक्षात आली आहे. त्यामुळे तो माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे एटीएसने सांगितले.
आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वाढीव कोठडीला विरोध केला, आतापर्यंत कोठडीत एटीएसच्या हाती काहीही लागलेले नाही. कर्नाटक पोलिसांनी त्याच्याकडून ४० मोबाइल जप्त केले आहेत. एटीएसने कर्नाटक पोलिसांकडून माहिती घ्यावी. त्यामुळे वाढीव पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. दोघांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने काळेसह तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
...त्या मोबाइलचा शोध घेणे बाकी
नालासोपारा स्फोटकांप्रकरणी आतापर्यंत अटक केलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, अविनाश पवार, वासुदेव सूर्यवंशी आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उखडुर्ली लोधीसह गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांच्या प्रशिक्षणादरम्यान काळेने त्याचा मोबाइल बंद केला होता. तो अन्य मोबाइल क्रमांकाने सर्वांच्या संपर्कात होता. त्या मोबाइल क्रमांकाचा शोध घेणे बाकी आहे, असे सांगून एटीएसने १४ दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणी केली, तसेच डायरी न्यायालयात सादर करण्यात आली.