पत्नीच्या चाैकशीनंतर आला दबावात, अमृतपालला अशी झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 06:24 AM2023-04-24T06:24:23+5:302023-04-24T06:24:54+5:30
अटकेनंतर तत्काळ आसामच्या दिब्रुगड तुरुंगात रवानगी; चोहोबाजूने घेरून पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : महिनाभराहून अधिक काळ फरार असलेला कट्टरपंथी प्रचारक अमृतपाल सिंग याला रविवारी सकाळी पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. रोडे गावात पोलिसांनी चोहोबाजूने घेरून सकाळी ६:४५ वाजता त्याच्या मुसक्या आवळल्या. अटकेनंतर त्याची विशेष विमानाने तत्काळ आसाममधील दिब्रुगड तुरुंगात रवानगी करण्यात आली.
लष्करी कारवाईत ठार झालेला दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा रोडे गावातील असून, अमृतपाल सिंग याची गेल्यावर्षी याच गावात आयोजित एका कार्यक्रमात ‘वारीस पंजाब दे’ संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. पोलिस महानिरीक्षक सुखचैन सिंग गिल यांनी येथे पत्रकार परिषदेत अमृतपालच्या अटकेची घोषणा केली. ते म्हणाले, अटकेनंतर अमृतपालला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) आसाममधील दिब्रुगड येथे नेण्यात आले आहे. अकाल तख्तचे माजी जत्थेदार जसबीर सिंग रोडे यांनी दावा केला की, अमृतपालने आत्मसमर्पण केले आणि तेही त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी मोगा येथे पत्रकारांना सांगितले की, सर्वप्रथम केंद्रीय संस्थांशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी पंजाब पाेलिसांना संपर्क केला. अमृतपालने मेळाव्याला संबोधित केले आणि नंतर आत्मसमर्पण करण्यासाठी गुरूद्वारातून बाहेर पडला.
अशी झाली अटक
n अमृतपालने
आत्मसमर्पण केले असते
तर गावात तणाव निर्माण झाला हाेता. अमृतपाल शनिवारी रात्री गावात
दाखल झाला.
n दुपारी आत्मसमर्पण करण्याची याेजना हाेती. मात्र, पाेलिस सकाळीच पाेहाेचले. संपूर्ण गावाला घेराव टाकला. काही अधिकारी साध्या वेशात गावात दाखल झाले.
n पळण्यासाठी कुठलाही मार्ग न राहिल्यामुळे ताे बाहेर आला आणि त्याला अटक करण्यात आली.
शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई होईल
जे लोक शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचा प्रयत्न करतात आणि देशाचा कायदा मोडतात, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. आम्ही कोणत्याही निष्पाप व्यक्तीला त्रास देणार नाही. आम्ही सुडाचे राजकारण करत नाही. या ३५ दिवसांत शांतता आणि सलोखा राखल्याबद्दल मी पंजाबच्या ३.५ कोटी जनतेचे आभार मानतो.
- भगवंत मान, मुख्यमंत्री, पंजाब
पत्नीच्या चाैकशीनंतर आला दबावात
n अमृतपालची पत्नी किरणदीप काैर यांना दाेन दिवसांपूर्वी लंडनला जाण्यापासून सुरक्षा दलांनी राेखले. त्यांची चाैकशी करण्यात आली. तसेच विविध कागदपत्रांनी त्यांच्याकडून लेखी नाेंद करून घेण्यात आली.
n किरणदीप यांनी त्यास विराेध केला हाेता. मात्र, त्यांच्या चाैकशीनंतरच अमृतपाल दबावाखाली आला. त्याच्या अटकेबाबत गृहमंत्री अमित शाह यांनीही इशारा दिला हाेता. पाेलिसांनी त्याच्या एकेक साथीदाराला अटक केली. साथीदार पापलप्रीत सिंग अटक झाल्यानंतर त्याला लपण्यासाठी जागाही मिळेनासी झाली हाेती. ताे एकटा पडला आणि त्याच्या भाेवती फास आवळत गेला.
गुरूद्वाराचे पावित्र्य राखले...
अमृतपाल हजर असलेल्या गुरूद्वाराचे पावित्र्य राखण्यासाठी पोलिस आत गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. गुरूद्वाराच्या आत काय घडले आणि आत अमृतपाल काय बोलला, यावर भाष्य करणे योग्य नाही. गेल्या ३५ दिवसांपासून ही मोहीम सुरू होती, असेही गिल यांनी सांगितले.
आत्मसमर्पणाचा दावा पाेलिसांनी फेटाळला
सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडीओमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपालने आत्मसमर्पण केल्याचा दावा केला आहे. त्याचा हा दावा फेटाळून लावताना गिल म्हणाले की, पंजाब पोलिसांना रोडे गावात त्याच्या उपस्थितीची माहिती मिळाली आणि पोलिसांनी गावासह त्याला चारही बाजूंनी घेरले, त्याच्या सुटकेची कोणतीही संधी सोडली नाही.