पालघरमध्ये १८ वर्षीय मुलीची भरदिवसा गळा चिरून हत्या, संशयित फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 04:45 PM2023-10-06T16:45:40+5:302023-10-06T16:51:19+5:30
या घटनेमुळे पुन्हा एकदा आश्रमशाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- हुसेन मेमन
जव्हार : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा मोखाडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. मोखाडा शहरात शुक्रवारी भरदिवसा एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या अर्चना उदार ( वय १८) या मुलीची अज्ञाताने कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा आश्रमशाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राथमिक तपासादरम्यान ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, संशयित आरोपी प्रभाकर वाघेरे (वय २२) फरार झाला असून मोखाडा पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे पुढील तपास करीत आहेत. आश्रमशाळेत वर्गखोल्या कमी असल्याने या आश्रमशाळेपासून ५०० ते ६०० मीटर लांब असलेल्या महाविद्यालयात येथील ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना दररोज चालत नेण्यात येते.
अशावेळी शिक्षक या मुलांसोबत असतात. मात्र, आज सकाळी मुली वर्ग संपवून जेवण्यासाठी पुन्हा महाविद्यालयाकडून आश्रमशाळेकडे जात होते. त्यावेळी निर्मनुष्य असलेल्या कब्रस्तानाच्या पाठीमागेच प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारदार कोयत्याने गळा चिरून हत्या केली. यावेळी तिच्या मैत्रीणीनी घाबरून आरडाओरडा केला. मात्र, काही लोक मदतीला धावण्याआधीच प्रभाकरने तिथून पळ काढला.