भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2023 10:04 PM2023-08-07T22:04:36+5:302023-08-07T22:04:45+5:30

डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या नागरिकांवर वारंवार भ्याड हल्ले होत असल्याने या समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

An atrocity case has been filed against BJP's Palghar district president Bharat Rajput | भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

googlenewsNext

- हितेन नाईक

पालघर : भाजपचे पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि डहाणू नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत आणि अन्य तीन जणांविरोधात डहाणूतील एका आदिवासी व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     
डहाणू तालुक्यातील एंट्रीगेट नवापाडा येथील रहिवासी असलेले प्रकाश अनंत ठाकरे यांना शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता भरत बंसराज राजपूत, त्यांचा भाऊ जगदीश बंसराज राजपूत, विशाल नांदलस्कर व राजेश ठाकुर यांनी डहाणू शहरातील रामवाडी येथील कार्यालयात बोलावले. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार पीडित प्रकाश यांनी केली आहे. नोव्हेबर 2022 साली भरत राजपूत व त्याच्या सहकाऱ्यांनी अरुणा भावर या आदिवासी महिलेचे अपहरण करून तिचा शोध घेणाऱ्या पती व कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ह्या प्रकरणी तक्रारी झाल्या नंतर त्यांच्या विरोधात कुठलीही कठोर कारवाई झाली नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.
   
डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या नागरिकांवर वारंवार भ्याड हल्ले होत असल्याने या समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तथापि गुन्हेगारी प्रवृतीच्या भरत बंसराज राजपूत, जगदीश बंसराज राजपूत, विशाल नांदलस्कर व राजेश ठाकुर यांनी केलेल्या जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी यांच्यावर आपण एट्रोसीटी कायद्याअंतर्गत गुन्हा त्वरित नोंद करुन अटक करण्याची मागणी केली होती. तक्रार करूनही त्यांच्या विरोधात डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला जात नसल्याने जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज व भूमिपुत्र यांच्याकडून 8 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता 'सरावली जकात नाका ते डहाणू पोलीस स्टेशनपर्यंत' निषेध मोर्चा काढला जाणार होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री रवींद्र शिंदे ह्यांचे निकटवर्तीय असल्याने पोलिस त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार देत होते.परंतु सुमारे दोन हजार मोर्चेकरी पोलिस ठाण्यावर धडकणार असल्याने शेवटी डहाणू पोलिसांनी चारही आरोपी विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 (ॲट्रॉसिटी), इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे,शांतता भंग करणे, धाक दाखवणे,आदी विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी आपल्या जीवाला धोका असल्याने पोलीस बंदोबस्त मिळावी अशी मागणी फिर्यादी प्रकाश अनंत ठाकरे यांनी डहाणू  पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

Web Title: An atrocity case has been filed against BJP's Palghar district president Bharat Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.