रिक्षाचालकाकडून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न?; वर्सोव्यात निर्जनस्थळी चालकाने नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 10:04 AM2022-12-04T10:04:32+5:302022-12-04T10:04:49+5:30
चालू रिक्षामध्ये ती त्याला सतत जाब विचारत होती; मात्र उत्तर न देता तो गाडी चालवीत होता.
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : कोरियन यूट्युबरसोबत छेडछाडनंतर वर्सोवामध्ये एका तरुणीचे रिक्षाचालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शनिवारी करण्यात आला. ही तरुणी व्यवसायाने इंटेरियर डेकोरेटर असून या घटनेनंतर ती चांगलीच घाबरली असल्याने याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.
तरुणीचे नाव ऋचा अटल असे असून, अंधेरी लोखंडवाला परिसरातून दुपारी एकच्या सुमारास तिने वीरा देसाई रोड येथे जाण्यासाठी (एमएच०२०१ ६१३५) रिक्षा पकडली. मोबाईलवर गाणी ऐकत असल्याने तिचे लक्ष त्यावरच होते जी तिची मोठी चूक असल्याचे ती सांगते. बराच वेळ होऊनही इच्छित स्थळी कसे पोहोचले नाही असे वाटल्याने तिने आसपास पाहिले. तेव्हा भलत्याच निर्जनस्थळी आपण आल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे ती रिक्षाचालकावर ओरडली आणि मला इथे का आणले ? असे त्याला विचारले. चालू रिक्षामध्ये ती त्याला सतत जाब विचारत होती; मात्र उत्तर न देता तो गाडी चालवीत होता. त्यामुळे तिने मैत्रिणीला चॅटवर घडला प्रकार सांगितला. मैत्रिणीने ऋचाला लोकेशन मागितले. त्यामुळे तो वर्सोवा म्हाडा परिसर असल्याचे ऋचाला समजले. दरम्यान, तिची सिद्धी नावाची मैत्रीण त्याच परिसरात कॉफी पिण्यासाठी आली होती. तिला ऋचाने रिक्षा क्रमांकाचा फोटो शेअर केला, मात्र ती एकटी असल्याने काहीच करण्याची हिंमत तिला झाली नाही.
पोलिसांची गाडी पाहून यू टर्न
मी आय लव्ह वर्सोवा लोकेशनच्या आसपास होते. तिथे दूरवर पोलिसांची एक गाडी उभी होती ज्याच्या जवळ एक पोलिस कर्मचारी फोनवर बोलत उभे होते. या पोलिसांना पाहून चालक यू टर्न घेऊ लागला. मी कुणाला तरी पत्ता विचारतो असे मला सांगू लागला. मात्र, पोलिसांना पाहून मला धीर आला आणि आत्ताच्या आत्ता मला इथेच उतरव असे मी त्याला सांगितले. कारण मला त्याच्या तावडीतून सुटायचे होते. - ऋचा अटल, पीडित तरुणी
घाबरल्याने तक्रार नाही
घडला प्रकार ऋचा हिने तिची फ्लॅटमेट प्रोमिता मुखर्जी यांना सांगितला. त्यानुसार त्यांनी लगेचच याप्रकरणी मुंबई पोलिसांना ट्विट केले.ऋचा या प्रकारामुळे घाबरली असून, ती रविवारी बाहेरगावी जाणार असल्याने ती परत आल्यावर या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे तिच्या निकटवर्तीयानी सांगितले.