माजी गृहमंत्र्यांच्या खिशातून मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला, चोरटा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 01:45 PM2022-10-10T13:45:30+5:302022-10-10T13:46:12+5:30
सुशील कुमार शिंदे हे गुरुवारी सकाळी दादरच्या गजबजेल्या गर्दीच्या परिसरातून रेल्वे स्थानकावर जात होते
मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या खिशातून मोबाईल चोरण्याचाचोरट्याचा डाव चांगलाच फसला, कारण, शिंदे यांनी चोरट्याला रंगेहात पडकले. त्यामुळे, माजी गृहमंत्र्यांच्या खिशात हात घालणारा चोरटा पोलिसांत्या ताब्यात गेला. विशेष म्हणजे मुंबईतील दादर स्टेशन परिसरात हा प्रकार घडला असून चोरटा सुशील कुमार शिंदे यांच्या सोलापूरचाच रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.
सुशील कुमार शिंदे हे गुरुवारी सकाळी दादरच्या गजबजेल्या गर्दीच्या परिसरातून रेल्वे स्थानकावर जात होते. या परिसरात चोरट्याने शिंदे यांचा पाठलाग करुन त्यांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचक्षणी शिंदेंनी चोरट्याचा हात धरला. त्यामुळे, त्यांच्या खिशातील मोबाईल शाबूत राहिला. या घटनेनंतर चोरट्याल पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे. संबंधित मोबाईल चोर हा सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील घाटणे गावचा रहिवाशी आहे. त्यामुळे, नेमक्या कुठल्या उद्देशाने चोरट्याने शिंदेंच्या खिशात हात घातला होता, याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
दरम्यान, सुशील कुमार शिंदे हे काँग्रेस सरकारच्या काळात केंद्रात गृहमंत्री राहिले आहेत. सुरुवातीच्या काळात ते फौजदारही होते. त्यामुळे, त्यांच्या खिशातून मोबाईल चोरणे चोरट्याला चांगलंच महागात पडलं आहे.
आता लोक मला विसरत आहेत
गुजराती मित्र मंडळाच्या एका कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावईही गुजराती आहे. त्यामुळे मला ते करावे लागले. जावयाला सांभाळायचे म्हंटल्यावर हे सगळं करावं लागतं. हे सगळे केल्यामुळे मी तिथे पुन्हा निवडून आलो. ही साधी गोष्ट नव्हती. पण, आता हळूहळू माझ्या मतदारसंघातील नागरिक मला विसरून चाललेत असेही शिंदेंनी या कार्यक्रमात म्हटले.