भिवंडीत जमीन विक्री व्यवहारातून वृध्द शेतकरी महिलेची पाऊणे चार कोटींची फसवणूक
By नितीन पंडित | Published: January 12, 2024 05:50 PM2024-01-12T17:50:42+5:302024-01-12T17:50:55+5:30
याप्रकरणी महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी: वृध्द महिलेच्या शेतजमिनीचे पैसे न देता परस्पर विक्री करून पाऊणे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीतील काल्हेर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काल्हेर गावातील रंगुबाई ऊर्फ रंगीबाई पंढरीनाथ पाटील,वय ७५ वर्षे यांच्या नावे मौजे काल्हेर येथील सर्व्हे क्रमांक १९१/२ मधील एकूण ७० गुंठे जमीन ७ लाख रुपये प्रति गुंठा दराने ४ कोटी ९० लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरवून गावातीलच राजन व्दारकानाथ भोकरे यांनी नोंदणीकृत साठेकरार करून घेत त्या बदल्यात जमीन मालक रंगुबाई व त्याच्या मुलीला १ कोटी १३ लाख ७५ हजार एवढी रक्कम दिली व ७४ लाख रुपयांचे धनादेश दिले.
राजन भोकरे याने दिलेले ७४ लाखांचे धनादेश खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाले.तर त्यासोबत व्यवहाराची उर्वरित रक्कम ३ कोटी ७६ लाख २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देवून ही व्यवहार पुर्ण न करताच ,वृध्द महिलेस अंधारात ठेऊन २ ऑगस्ट २०२२ रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय भिवंडी १ यांचे कार्यालयातुन दस्त नोंद करून जमीनीचे खरेदीखत स्वतःचे नावे नोंदवून तलाठी सजा काल्हेर कार्यालायातुन फेरफार क्र. ७३२३ अन्वये सदर जमीनीचा ७/१२ स्वतःचे नावे करून घेतला.
विशेष म्हणजे वृध्द महिलेची मुलगी मयत असल्याने तिच्या मुलाचे नाव सदरच्या जमीन सातबाऱ्यावर वारस म्हणुन नोंद न करता मुलीचे नाव कमी केले.या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वृध्द महिलेने दिलेल्या तक्रार वरून नारपोली पोलिस ठाण्यात राजन व्दारकानाथ भोकरे या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.