नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने घातला लाखोंचा गंडा, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:42 AM2024-03-18T10:42:29+5:302024-03-18T10:42:58+5:30
नोकरीचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक, पीयूष गोयल यांच्या नावाचाही वापर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विधान परिषदेतील कार्यालयातील कारकुनासह पाच जणांविरुद्ध विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेत २५ लाखांत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने विक्रोळीतील तरुणाची १५ लाखांना फसवणूक केल्याचा आरोप आहे. सचिन चिखलकर असे कारकुनाचे नाव असून त्याच्याविरुद्ध हा दुसरा गुन्हा आहे.
विक्रोळी परिसरात राहणाऱ्या संदीप रामचंद्र सलते (४०) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, २०१८ मध्ये संजय कोळी या व्यक्तीने मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी असल्याचे सांगितले. सचिन चिखलकर हा नीलम गोरे यांचा सचिव असल्याचे सांगून मंत्रालयीन कोट्यातून मध्य रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देतात, असे त्याने सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून होकार दिला. त्यांनी पत्नीसाठी नोकरीबाबत चर्चा केली. कोळी याने विधान परिषदेमध्ये चिखलकरसोबत भेट करून दिली. चिखलकर यांनी रेल्वेमध्ये कारकूनपदासाठी २५ लाख आणि टीसीसाठी ४० लाख रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, त्यांनी कारकूनपदासाठी सहमती दाखवताच चिखलकरने पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. पुढे घाटकोपर येथे झालेल्या भेटीत चिखलकर याने प्रकाश चव्हाण व रामचंद्र पाटील यांच्याशी सहकारी म्हणून ओळख करून दिली. पुढे, पोलिस व्हेरिफिकेशनसाठी १ लाख, मेडिकलच्या वेळी तीन लाख रुपये व मेडिकल झाल्यानंतर दहा लाख रुपये परीक्षेसाठी लागतील. तसेच नोकरी लागल्यानंतर दहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सर्व मिळून २५ लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले.
ऑगस्ट २०१८ मध्ये संजय कोळी व रामचंद्र पाटील या दोघांकडे नोकरीसाठी टोकन म्हणून एक लाख रुपये दिले. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी कोळीने व्हाॅट्सॲपवर रेल्वे ‘रिक्रूटमेंट बोर्डा’चे परीक्षेचे हॉल तिकीट पाठवून २३ ऑगस्ट रोजी भुसावळ येथे परीक्षा असल्याचे सांगितले. त्यानुसार, पत्नीसोबत भुसावळ गाठले. डीआरएम ऑफिस भुसावळ येथे जाताच तेथे परीक्षकांबरोबर सचिन चिखलकर देखील होता. त्यांनी पेपरचे पूर्ण मार्गदर्शन पत्नीच्या वनिता हिच्या मोबाइलवर पाठवले होते. त्यानंतर, वेळोवेळी एकूण १५ लाख रुपये आरोपींपर्यंत पोहचवले. पुढे कोरोनामुळे ट्रेनिंग होणार नसल्याचे सांगून टाळाटाळ केली.
पीयूष गोयल यांच्या नावाचाही वापर...
पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेतल्यामुळे आता काहीच होणार नसल्याचे चिखलकर याने काही दिवसांनंतर सांगून, पैसे परत मिळतील असे सांगितले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने संशय आला. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. चिखलकर याला निलंबित करण्यात आले असल्याचेही विक्रोळी पोलिसांनी सांगितले.