नाशिकमध्ये हायप्रोफाइल बंगले भरदिवसा फोडणाऱ्या इंजिनिअरसह त्याच्या दोस्ताला बेड्या
By अझहर शेख | Published: January 3, 2024 07:16 PM2024-01-03T19:16:04+5:302024-01-03T19:16:28+5:30
आधुनिक साधनांचा करायचे वापर
अझहर शेख, नाशिक : उच्चभ्रू भागात रेकी करत कुलुपबंद बंगले हेरून त्यांच्या खिडक्यांचे भरदिवसा लोखंडी ग्रील कापून आतमध्ये प्रवेश करत मास्टरबेडरूमधून मौल्यवान दागिने, वस्तू व रोख रक्कमवर डल्ला मारणारा इंजिनिअरसह त्याचा पदवीधर साथीदाराच्या अखेर गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने वापी, दमण परिसरातून मुसक्या बांधल्या. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली चोरीची कार, ३०ग्रॅम सोने व घरफोडीसाठी वापरणारे आधुनिक साहित्य असा सुमारे ७ लाख ५३ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गंगापुररोड परिसरातील शारदानगरमधील शरण बंगल्याच्या किचनच्या पाठीमागील खिडकीचे लोखंडी ग्रील कापून आतमध्ये प्रवेश करत चोरांनी रोख रक्कम, सोन्याचे कॉइन, महागडे ब्रॅन्डेड घड्याळ, गोदरेजची लोखंडी तिजोरी असा सुमारे २ लाख ३१ हजार रूपयांचा ऐवज गायब केला होता. याप्रकरणी यश हरिष हेमदानी (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापुर पोलिस ठाण्यात गेल्या मंगळवारी (दि.२६) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाकडून केला जात होता. घरफोडी करणाऱ्या संशयितांची ओळख घटनास्थळावरील एका छुप्या ब्ल्यूटूथवर चालणाऱ्या सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पटली होती. तांत्रिक विश्लेषण करत वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय ढमाळ, सहायक निरिक्षक हेमंत तोडकर, उपनिरिक्षक रवींद्र बागुल यांनी तपासाला गती दिली. दरम्यान, संशयित हे गुजरातच्या वापी परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून ढमाळ यांनी पथकाला सज्ज करून वापी गाठले. तत्पुर्वी दमण परिसरातही संशयितांचा शोध घेण्यात आला. संशयित रोहन संजय भोळे (३६,रा.उपनगर), ऋषिकेश उर्फ गुड्डू मधुकर काळे (२७,रा.नाशिकरोड) या दोघांना शिताफीने वापीच्या एका हॉटेलमधून पथकाने ताब्यात घेतले आहे. या दोघा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारपर्यंत (दि.६) पोलिस कोठडी सुनावली आहे.
सराईत गुन्हेगार; घरफोडीचे चार गुन्हे उघड
गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर जी ओझर येथे घरफोडी करून पळविली होती, तीदेखील जप्त करून त्या दोघांना नाशिकला आणले. हे दोघेही सराईत गुन्हेगार आहे. संशयित रोहन हा मॅकेनिकल इंजिनिअर असून ऋषिकेश हा पदवीधर आहे. त्यांची कसून चौकशी केली असता गंगापुर परिसरातील दोन व ओझर, सिन्नर येथील एक असे एकुण घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापुर्वीही अनेकदा असे घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे ढमाळ यांनी सांगितले.