अक्षय कुमारच्या बहिणीची मनसे विभागप्रमुखानं केली खोटी सही?; फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 02:04 PM2022-09-23T14:04:11+5:302022-09-23T14:05:35+5:30
गणेश चुक्कल यांच्यावर अक्षय कुमारची बहीण अलकाची बनावट स्वाक्षरी केल्याचा आरोप आहे
मुंबई - मनसेचे घाटकोपर विभाग प्रमुख गणेश चुक्कल यांच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेता अक्षय कुमारची बहिण अलका हिरानंदानीची बनावट स्वाक्षरी केल्याचा चुक्कल यांच्यावर आरोप आहे. अलका यांच्या कंपनीकडून याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. गणेश चुक्कल यांच्या कंपनीला ३ वर्षासाठी फ्लॅट रेंटवर दिला होता. परंतु बनावट कागदपत्राच्या माध्यमातून फ्लॅट ३० वर्ष भाड्याने दिल्याचं दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.
गणेश चुक्कल यांच्यावर २ कोटींहून अधिक थकबाकी आहे. अक्षय कुमारच्या बहिणीच्या कंपनीने पवई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. अक्षय कुमारच्या बहिणीचा पवईच्या हिरानंदानी गार्डनमध्ये फ्लॅट आहे. हा फ्लॅट गणेश चुक्कल वापरत आहेत. याच फ्लॅटवरून फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु गणेश चुक्कल यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेश चुक्कल हे मनसेचे घाटकोपर पश्चिमचे विभाग अध्यक्ष आहेत.
गणेश चुक्कल यांच्यावर अक्षय कुमारची बहीण अलकाची बनावट स्वाक्षरी केल्याचा आरोप आहे. पवईतील हिरानंदानी येथील फ्लॅट ३ वर्षासाठी भाड्याने दिला होता. करारानुसार गणेश चुक्कल यांना फ्लॅट खाली करायचा होता परंतु त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. चुक्कल यांनी फ्लॅट ३ नव्हे तर ३० वर्षासाठी भाड्याने घेतल्याचा करार असल्याचं म्हटलं. परंतु अलका यांच्या कंपनीच्या वकिलांनी या कराराचा नकार दिला.