बापाने अत्याचार केलेल्या आजारी मुलीचा मृत्यू; बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 09:04 AM2023-11-18T09:04:58+5:302023-11-18T09:05:08+5:30
उपचार सुरू असलेल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा : बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. बापानेच २२ वर्षीय मुलीला घरात डांबून तिला मारहाण करत अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. पीडित मुलगी क्षयरोगाने आजारी असतानाही अत्याचार सुरू होते.
उपचार सुरू असलेल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी नालासोपारा येथे राहत होती. मागील ३ महिन्यांपासून ती क्षयरोगाने आजारी होती. तिला ११ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
मुलगी होती गर्भवती
संबंधित प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी तो देत होता. मुलीला तो बळजबरीने घरात डांबून ठेवत होता. त्यामुळे पीडित आणि तिची आई भीतीपोटी गप्प राहत होते. हे प्रकार सातत्याने वाढत होते. या काळात मुलगी गर्भवती झाली होती. त्यावेळी तिचा आरोपी पित्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला होता. पीडित मुलीचा मृत्यू हा क्षयरोगाने झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली असल्याची माहिती नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह बागल यांनी ‘लोकमत’ला दिली.