बायकोशी बोलू नको, तुला संपवून टाकीन; धमकी, झाडाझुडपात मृतदेह, संशयितही लपले जंगलात!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 04:19 PM2022-12-13T16:19:09+5:302022-12-13T16:29:38+5:30

जळगावमधील धक्कादायक घटना

An incident of killing a sweeper on suspicion of having an immoral relationship with his wife has taken place in Jalgaon. | बायकोशी बोलू नको, तुला संपवून टाकीन; धमकी, झाडाझुडपात मृतदेह, संशयितही लपले जंगलात!

बायकोशी बोलू नको, तुला संपवून टाकीन; धमकी, झाडाझुडपात मृतदेह, संशयितही लपले जंगलात!

Next

जळगाव: अनैतिक संबंधाच्या संशयातून कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बेपत्ता सफाई कर्मचाऱ्याचा धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून मृतदेह घनकचरा प्रकल्प रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ फेकून दिला. ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्यासुमारास समोर आली. प्रमोद ऊर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय ३३, रा. जय भवानीनगर, मेहरूण) असे मृताचे नाव आहे. सफाई कर्मचारी हा शनिवारी दुपार ४ वाजता ड्युटी संपवून घरी निघाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.

जय भवानी नगरात प्रमोद शेट्टी हे आई-वडील, पत्नी, मुलगी व मुलासह वास्तव्यास होते. बांभोरी येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ते गेल्या आठ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर सफाई कर्मचारी म्हणून कामाला होते. शनिवारी सकाळी ७ वाजता प्रमोद हा नेहमीप्रमाणे कामावर गेला. मात्र, रात्री ११ वाजले तरी मुलगा घरी आला नाही. त्यामुळे अनेकवेळा वडील सुरेश शेट्टी यांनी मुलाच्या मोबाईलवर फोन केला; पण मोबाईल बंद येत होता. अखेर शेट्टी कुटुंबीयांनी विद्यापीठातसुद्धा विचारणा केली. नंतर रविवारी एमआयडीसी पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार सुरेश शेट्टी यांनी दिली.

दोन दिवसांपासून एकाच ठिकाणी दुचाकी...

निमखेडी शिवारातील घनकचरा प्रकल्पाजवळील एका महादेव मंदिराजवळ सोमवारी सकाळी काहीजण बकऱ्या चारत होते. दोन दिवसांपासून त्यांना एकाच ठिकाणी दुचाकी (एमएच १९.एएल.०५०१) लागलेली दिसून आली. एवढेच नव्हे, तर दुचाकीला चावीसुद्धा होती. ही बाब त्यांनी आव्हाण्यातील सरपंच यांना सांगितली. सरपंचांनी तालुका पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, नयन पाटील, हरिलाल पाटील, लीलाधर महाजन, संजय भालेराव, दीपक कोळी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना दुचाकी आढळून आली.

ओळखपत्रावरून पटली ओळख...

पोलिसांनी दुचाकीच्या डिकीची तपासणी केली. त्यात ओळखपत्र व काही पावत्या मिळून आल्या. त्यावर प्रमोद शेट्टी असे नाव होते. पोलिसांनी लागलीच शहरातील पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली. त्यात प्रमोद शेट्टी हा व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद एमआयडीसी पोलिसात मिळाली आणि मृताची ओळख पटली. ही घटना सुरेश शेट्टी यांना कळाल्यानंतर घटनास्थळी येऊन मृतदेह पाहिला, तेव्हा तो मृतदेह त्यांच्या मुलाचा असल्याचे स्पष्ट झाले.

झाडाझुडपात आढळला मृतदेह

तालुका पोलिसांनी महादेव मंदिराच्या परिसरात लागलीच प्रमोद याचा शोध सुरू केला. मंदिराच्या काही अंतरावर झाडाझुडपात प्रमोद याचा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. प्रमोद याच्या गळ्यासह हातावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेले आढळून आले. संपूर्ण चेहरा हा रक्ताने माखलेला होता. घटनास्थळी श्वानपथकसुद्धा दाखल झाले होते. पोलिसांनी मृताचा रुमाल व काही वस्तू मंदिराच्या परिसरात मिळून आल्या; पण मोबाईल मिळून आला नाही.

घटनास्थळाची पाहणी

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्यासह तालुका व एलसीबीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. काही पुरावे मिळतात का? यासाठी पोलिसांकडून घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली जात होती.

संशयित जंगलात लपून बसले...

एलसीबी, तालुक्यासह एमआयडीसी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. खुनाच्या गुन्ह्यात सत्यराज नितीन गायकवाड (२६, रा. गणेशनगर) व सुनील लियामतखाँ तडवी (२६, रा. पंचशिलनगर, तांबापुरा) यांचा समावेश असून, ते उमाळा शिवारातील जंगलात लपून बसले असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, अतुल वंजारी, सुधीर साळवे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, हेमंत कळसकर, छगन तायडे, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील यांनी सायंकाळी ६ वाजता उमाळा गाठून दोघांना अटक केली. त्यानंतर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.

खुनामागची ही आहे स्टोरी...

सुमारे २ वर्षांपूर्वी शेट्टी यांनी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोली सुनील तडवी यास भाडेतत्त्वावर दिली होती. त्याच्या घरी सत्यराज गायकवाड हा नेहमी ये-जा करायचा. सहा महिन्यांपूर्वी सुनील याने प्रमोद शेट्टी याच्याशी, तू माझ्या पत्नीशी का बोलतो, तिच्याकडे का पाहतो, या कारणावरून भांडण केले होते. याबाबत त्याने एमआयडीसी पोलिसात तक्रारही दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये नेहमी वाद होत असल्याने सुरेश शेट्टी यांनी सुनील याच्याकडून काही महिन्यांपूर्वी खोली खाली करून घेतली होती. तेव्हापासून सुनील व सत्यराज हे प्रमोद याच्यावर खुन्नस ठेवून अधूनमधून जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. गुरुवार, दि. ८ रोजी प्रमोद हा कामावरून घरी परत आला, तेव्हा सुनील हा तेथे आला आणि साल्या, तू माझ्या बायकोचा पिछा सोडून दे नाही तर तुला कायमचे संपवून टाकीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली होती. त्यानंतर दोघांनी शनिवारी प्रमोद याला निमखेडी शिवारात बोलावून अनैतिक संबंधाच्या संशयातून त्याचा खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: An incident of killing a sweeper on suspicion of having an immoral relationship with his wife has taken place in Jalgaon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.