प्रेम, लैंगिक शोषण, गोळ्या अन् गर्भपात; मग पुन्हा...; अमरावतीमधील भयावह घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 16:34 IST2023-02-27T16:34:05+5:302023-02-27T16:34:37+5:30
ब्रेकअपनंतर दुसऱ्याकडून धोका....

प्रेम, लैंगिक शोषण, गोळ्या अन् गर्भपात; मग पुन्हा...; अमरावतीमधील भयावह घटना
अमरावती: तुझ्यावर माझे नितांत प्रेम आहे, आपण रजिस्टर लग्न करू, अशी बतावणी करत एका तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात आले. पुढे तिचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतरही त्याने नामानिराळा होण्याचा प्रयत्न केल्याने अखेरीस त्या तरुणीने पोलिस ठाणे गाठले. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत जानेवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२३ या दोन वर्षांच्या कालावधीत ती छळमालिका घडली.
याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी संदीप फुसलकर (२५, रा. वडरपुरा) विरुद्ध शनिवारी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. आसाम गुवाहाटी येथील एका तरुणीची येथील नितीन नामक तरुणाशी फेसबुकवर ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून तो तिला अमरावतीत घेऊन आला. मात्र, पुढे त्यांच्यात खटके उडू लागल्याने ती ५ नोव्हेंबर २०२० रोजी गुवाहाटीला परतली. त्या दोघांमधील संबंध तेव्हाच संपुष्टात आले. दरम्यान, जानेवारी २०२१ मध्ये ती अमरावतीत परतली. ओळखीतील संदीपने तिला भाड्याची खोली करवून तिला प्रपोझ केले. तेथे तिचे शारीरिक शोषण केले.
गर्भपातासाठी गोळ्या
संदीप पीडिताच्या खोलीवर आला असता, आपण दीड महिन्यांची गर्भवती असल्याची बाब तिने सांगितली. आपल्याला नोंदणी विवाह करावा लागेल, असे म्हणताच त्याने ती बाब टोलविली. त्याने तिला गर्भपाताचा सल्ला दिला. भूलथापा देऊन त्सासाठी गोळ्या दिल्या. त्यामुळे १८ फेब्रुवारी रोजी तिचा गर्भपात झाला.
घरातून दिले हाकलून
गर्भपाताचे कळविल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी त्याने पुन्हा अत्याचार केला. मात्र, त्यानंतर तो नॉट रिचेबल झाल्याने पीडिताने त्याचे घर गाठले. तेथे त्याच्या आईला भेटून आपबिती सांगितली. मात्र, तिला तेथून शिवीगाळ करून हाकलून देण्यात आले. जबरीने गर्भपात केल्यानंतरही आरोपीने तिच्याशी लग्न केले नाही.