लग्नात १५ वर्षांची मुलगी नटून आली अन् दागिने घेऊन पसार झाली; चोरी सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:50 PM2023-01-28T13:50:26+5:302023-01-28T13:50:45+5:30
वैणू शिवमूर्ती कुडके (रा. बीड) यांचे पुत्र पवनराज यांचा २६ जानेवारीला धानोरा रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह होता.
बीड : अंदाजे १४ ते १५ वर्षांची मुलगी, नवा कोरा ड्रेस, चेहऱ्याला मेकअप लावून लग्नात वन्हाडी बनून आली. लग्न सोहळ्यानंतर वरमाई नातेवाइकांना बोलण्यात मग्न असतानाचा मुलीने पर्स घेऊन पोबारा केला. दहा तोळे सोने व रोख ९० हजार रुपये असा सुमारे पाच लाख ९० हजार रुपयांचा ऐवज तिने लंपास केला. ही घटना गुरुवारी शहरातील एका मंगल कार्यालयात घडली.
वैणू शिवमूर्ती कुडके (रा. बीड) यांचे पुत्र पवनराज यांचा २६ जानेवारीला धानोरा रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह होता. विवाह सोहळ्यानंतर वरमाई वैणू कुडके या नातेवाइकांशी बोलण्यात व्यग्र होत्या. बोलताना त्यांनी स्वतःकडील पर्स खुर्चीवर ठेवली. यावेळी वऱ्हाडी बनून आलेल्या एका १४ ते १५ वर्षांच्या मुलीने पर्स अलगद उचलली व पळून गेली. पर्समध्ये अंगठी, गंठण, सोनसाखळी, नथ असे सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने व रोख ९० हजार असा एकूण पाच लाख ९० हजारांचा ऐवज होता.
चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
पर्स लंपास झाल्याचे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरु झाली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा सगळा प्रकार निदर्शनास आला. शुक्रवारी वैणू कुडके यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून गुन्हा नोंद झाला. या अल्पवयीन मुलीसोबत अन्य एक जण असल्याचा पोलिसांचा कयास आहे.