"डॉन को पकडना...", बलात्काराच्या आरोपीनं चक्क पोलिसालाच केला WhatsApp कॉल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 04:15 PM2023-10-03T16:15:35+5:302023-10-03T16:23:54+5:30
पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा:- अमिताभ बच्चनच्या डॉन चित्रपटात प्रसिद्ध असलेला "डॉन को पकडणा मुश्किल नही नामुनकीन है" हा डायलॉग बलात्काराच्या आरोपीने चक्क तुळींजच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला व्हाटसअप कॉल करून सुनावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्याच्या एक महिन्यानंतर ४५ वर्षीय आरोपी नराधमाला भाईंदरच्या उत्तन परिसरातून अटक केली आहे. पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
१५ वर्षीय पीडित मुलगी घटनेच्या दिवशी कामावरून लोकल ट्रेनने घरी जात होती. त्यावेळी तिच्या प्रियकराने फोन करून वाढदिवस असल्याचे सांगून तू येऊन केक काप असे बोलला. पीडित तरुणी नायगाव रेल्वे स्थानकावर उतरली. त्यानंतर तिचा प्रियकर आला आणि तिला मुंबई अहमदाबाद हायवेवर असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. सर्व मित्र मैत्रिणीनी मिळून केक कापला आणि एकत्र जेवण केले. सगळे आपापल्या घरी जाऊ लागले. यावेळी तिला प्रियकराने मित्राला त्याच्या कारमधून नालासोपारा येथे सोडण्यास सांगितले. आरोपीने पीडितेला कारमध्ये लिफ्ट देऊन निर्जनस्थळी नेत कारमध्येच जबरदस्तीने बलात्कार केला.
घटनेनंतर पीडितेने कसा तरी तेथून पळ काढला. या घटनेने घाबरलेल्या मुलीने दुसऱ्या दिवशी घरी कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तुळींज पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी तपास सुरू केला.ही अल्पवयीन मुलगी तिच्या मूळ गावी राजस्थान येथे असल्याची माहिती मिळल्यावर राजस्थानमधूम मुलीला पोलिस ठाण्यात घेऊन आले. ती घरातून का पळून गेली याची चौकशी सुरू केली. मुलीने घडलेली हकीकत सांगितल्यावर ते ऐकून पोलिसही अवाक् झाले. आरोपीने तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवत असताना तिने ऑटोमॅटिक ऑडिओ रेकॉर्डिंग केले होते. याच ऑडिओ रेकॉर्डिंग आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे तुळींज पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
आरोपी नेहमी आपला मोबाईल बंद ठेवत होता. गरज पडेल तेव्हा तो इतरांशी नेट कॉलिंगद्वारे संपर्क करायचा. तो गेल्या एक महिन्यापासून पोलिसांशी लपाछपी खेळत होता. त्याच्याकडे राहण्यासाठी एकही जागा नसल्याने तो वारंवार जागा बदलत होता. पोलीस शोध घेत असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना व्हाट्सअप कॉल करून डॉन पिक्चरचा डायलॉग बोलला आहे. पण एकदा त्याने पत्नीशी संपर्क साधला. तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना मोबाईल ट्रेसच्या मदतीने माहिती काढून उत्तन परिसरातून अटक केली आहे. धनंजय दुबे उर्फ जय दुबे (४५) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केल्यावर ५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.