एका सराईत गुन्हेगाराला तीन महिन्यांसाठी केले हद्दपार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 05:08 PM2023-10-28T17:08:03+5:302023-10-28T17:08:22+5:30
या गुन्हेगाराच्या कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती.
गोंदिया : अवैध दारू विक्री, भांडण तंटा, विनयभंग अशा अनेक गुन्ह्यांत सहभागी असलेल्या शाहरुख हमीद शेख (रा. कुऱ्हाडी) याला उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांच्या आदेशान्वये गोंदिया जिल्ह्यातून तीन महिन्यांच्या कालावधीकरिता हद्दपार केले आहे. गोरेगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनसुद्धा त्याच्यात सुधारणा झाली नाही.
या गुन्हेगाराच्या कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. त्याच्याविरूद्ध पोलिस निरीक्षक भुसारी यांनी गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्यासाठी कलम ५६ (१), (अ), (ब) महाराष्ट्र पोलिस अधिनियमाअन्वये प्रस्ताव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला होता. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांच्या आदेशानुसार आमगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी विहीत मुदतीत हद्दपार प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून या गुन्हेगाराला गोंदिया जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याची शिफारस केली होती.
या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पूजा गायकवाड यांनी त्याला तीन महिन्यांच्या कालावधीकरिता गोंदिया जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.