चक्क आयटी तज्ज्ञालाच शेअर मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली ४२.६६ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 22:02 IST2025-01-09T22:02:43+5:302025-01-09T22:02:43+5:30
ॲपमध्ये त्यांना मोठा नफा दिसून येत होता. त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यात यश आले नाही.

चक्क आयटी तज्ज्ञालाच शेअर मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली ४२.६६ लाखांचा गंडा
योगेश पांडे
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी चक्क एका आयटी तज्ज्ञालाच शेअर मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली ४२.६६ लाखांचा गंडा घातला. सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरदान असे संबंधित आयटी तज्ज्ञाचे नाव असून ते खाजगी काम करतात. जानेवारी २०२४ मध्ये त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर लॉंग टर्म किंवा इन्ट्राडे स्टॉक बाबत विचारणा करणारा मॅसेज आला होता. समोरील व्यक्तीने एका व्हॉट्सअप ग्रुपला जोडणारी लिंक पाठविली. त्यानंतर वरदान वेल्स कॅपिटल इन्व्हेस्टमेंट या ग्रुपशी जोडल्या गेले. त्यात शेअर खरेदी व विक्रीबाबत माहिती दिली जात होती.
त्या ग्रुपची ॲडमिन श्रृती गुप्ता हिने ८७८७८५२०६६ या क्रमांकाच्या माध्यमातून वरदान यांच्याशी संपर्क साधला व दोन ॲप्सच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर भरघोस नफा मिळेल अशी बतावणी केली. त्यावर विश्वास ठेवत वरदान यांनी मॅट्रीक्स व वेल्स कॅपिटल या ॲपवर नोंदणी करत खाते सुरू केले. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्यात त्या ॲप्सवर सांगितलेल्या बॅंक खात्यांमध्ये ४२.६६ लाख रुपये वळते केले. ॲपमध्ये त्यांना मोठा नफा दिसून येत होता. त्यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यात यश आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.