मानसिक आजारातून वृद्धाचा पत्नीवर हल्ला, स्वतः गळफास घेत संपविले आयुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 08:40 AM2023-04-08T08:40:05+5:302023-04-08T08:40:22+5:30
पुन्हा पुनर्वसनगृहात पाठविण्याची भीती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बायपोलर या मानसिक आजारामुळे हिंसक झालेल्या ६४ वर्षीय पत्नीवर चाकूने वार करत स्वतः गळफास घेत आयुष्य संपविल्याची खळबळजनक घटना गुरुवारी मुलूंडमध्ये घडली. मुलीने घर गाठले तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात ग्रीलमध्येच बसून असल्याचे तिला दिसले. याप्रकरणी नवघर पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुलुंड पूर्वेकडील गव्हाणपाडा येथील ए विंग डेस्टिनी हाइट्स, रुम नं. १२०४ मध्ये पलाणी यादव ऊर्फ पलानी शिवन कोनार (६४) हे पत्नी कविता (५३) आणि मुलगी धान्या (३४) यांच्यासोबत राहण्यास होते. मुलगी धान्याच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, ६ एप्रिलला एलएलबीचा पेपर असल्याने दुपारी साडेबाराला घर सोडले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आई, वडिलांना कॉल करत असताना त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. अखेर, तिने घरी धाव घेतली. दरवाजाही उघडत नसल्याने चिंतेत भर पडली. शेजाऱ्यांकडील किल्लीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडला नाही. अखेर, चावीवाल्याला बोलावून दरवाजा उघडला तेव्हा हॉलमध्ये रक्ताचे डाग आणि त्याभोवती पडलेला चष्मा बघून धडकी भरली. किचनमध्येही कोणी नव्हते. बेडरूमचा दरवाजा आतून बंद होता.
त्यानंतर, पुन्हा हॉलमध्ये येताच हॉलमध्ये असलेल्या खिडकीच्या ग्रीलमधून आईचा चेहरा हलताना दिसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला ग्रीलमधून बाहेर काढून तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलवले. वडिलांनीही बेडरूममध्ये गळफास घेत आयुष्य संपविल्याची माहिती त्यांना मिळाल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या नवघर पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविला आहे.
पुन्हा पुनर्वसनगृहात पाठविण्याची भीती
वडिलांना १९९४- ९५ पासून बायपोलर हा मानसिक आजार आहे. त्यामुळे ते अधून-मधून हिंसक व्हायचे. २०१९ मध्ये ते एमटीएनएलमधून रिटायर झाल्यापासून ते घरीच होते. ४५ महिन्यांपूर्वीही हिंसक वागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने तळोजा येथे पुर्नवसन गृहात दाखल केले होते. मुलुंड येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संजय कुमावत यांचेकडे उपचार चालू होते. ५ एप्रिलला देखील त्यांना डॉक्टर कुमावत यांच्याकडे घेऊन गेलो होतो. तेथेही, त्यांना भीती वाटत असल्याचे दिसून आले. पुन्हा पुर्नवसन गृहात ठेवणार का? असे ते विचारत असल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली आहे.