जादूटोणाच्या संशयावरून झोपेतच अंगावर ॲसिड टाकून वृध्दाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 07:02 PM2023-09-19T19:02:43+5:302023-09-19T19:03:13+5:30

गावातील संशयित नंदू किशोर शेजूळ यांनी तीन महिन्यांपूर्वी श्रीरंग शेजूळ यांना धमकी दिली होती.

An old man was killed by throwing acid on his body in his sleep on suspicion of witchcraft | जादूटोणाच्या संशयावरून झोपेतच अंगावर ॲसिड टाकून वृध्दाचा खून

जादूटोणाच्या संशयावरून झोपेतच अंगावर ॲसिड टाकून वृध्दाचा खून

googlenewsNext

जालना : जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी एका वृध्दाच्या अंगावर रात्री झोपेतेच ॲसिड टाकले. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील म्हसरुळ येथे मंगळवारी उघडकीस आली. श्रीरंग हरीबा शेजूळ (८५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरुध्द जाफराबाद पोलिस ठाण्यात सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी उत्तम श्रीरंग शेजूळ (३२, रा.म्हसरुळ) यांच्या फिर्यादीवरून सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे वडील श्रीरंग हरीबा शेजूळ हे १ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात बाजेवर झोपले होते. फिर्यादी उत्तम शेजूळ हे गावातील सांस्कृतिक सभागृहात झोपण्यासाठी गेले. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने उत्तम शेजूळ हे चुलतभावाला सोबत घेऊन घराकडे धावत आले. यावेळी वडिलांच्या संपूर्ण अंगावर कुठलेतरी द्रव टाकलेले दिसले. त्यामुळे अंग भाजत असल्याने ते ओरडत होते. आजूबाजूला पाहिले असता कुणीच दिसून आले नाही. नंतर वडिलांना जाफराबाद ग्रामीण रुग्णालय व तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, सोमवारी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

गावातील संशयित नंदू किशोर शेजूळ यांनी तीन महिन्यांपूर्वी श्रीरंग शेजूळ यांना धमकी दिली होती. तसेच नंदू भास्कर साबळे यानेही श्रीरंग शेजूळ यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनीच वडिलांच्या अंगावर जिवे मारण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी संशयित नंदू किशोर शेजूळ (३३) याच्या घरातून ॲसिड जप्त केले असून, त्याला अटक केली आहे. तसेच संशयित आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन हे करीत आहेत.

Web Title: An old man was killed by throwing acid on his body in his sleep on suspicion of witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.