Cyrus Mistry: अनाहिता पंडोले वेगमर्यादा ओलांडणाऱ्या नेहमीच्या पाहुण्या; सायरस मिस्त्रींच्या मृत्यूस जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 07:57 AM2022-12-17T07:57:53+5:302022-12-17T08:08:50+5:30
तब्बल सात वेळा भरला दंड; जामीनपात्र गुन्ह्यामुळे अटक नाही
- हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : अपघातात जीव गमवावे लागलेले प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारच्या चालक डॉ. अनाहिता पंडोल यांनी महामार्गावर अपघात होण्याआधी अनेक वेळा वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात वेळा त्यांच्याकडून दंड वसूल केल्याची बाब पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. यामुळे या अपघातात गेलेले दोन बळी हे भरधाव वेगाने कार चालविल्यामुळे झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
डॉ. अनाहिता यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी तो जामीनपात्र असल्यामुळे त्यांना अद्याप अटक केलेली नाही, असे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सायरस मिस्त्री आणि त्यांच्यासोबत कारमध्ये पाठीमागे बसलेले जहांगीर पंडोल यांचा ४ सप्टेंबरला मुंबई-अमदाबाद महामार्गावरील चारोटी येथे सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला भरधाव मर्सिडीज कारची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. कार चालविणाऱ्या डॉ. अनाहिता पंडोल आणि त्यांच्या शेजारी बसलेले दरियस पंडोल जबर जखमी झाले होते.
अपघातानंतरच्या पोलिस चौकशीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून डॉ. अनाहिता आणि अपघातग्रस्त कार नावावर असलेल्या जे. एम. फायनान्शियल कंपनीला पालघर आणि मुंबई पोलिसांनी अनेक वेळा वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. पोलिसांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
डॉ. पंडोल चालवीत असलेल्या मर्सिडीज कारमधील डेटा रेकॉर्डप्रमाणे चालक प्रतितास १०० किलोमीटर वेगाने गाडी चालवत असताना मार्गिकेबाबत ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत नव्हता. या अपघातात जखमी झालेल्या दरियास पंडोल यांनीही पोलिसांनी दिलेल्या जबाबात डॉ. अनाहिता यांना तिसऱ्या मार्गिकेमधून दुसऱ्या मार्गिकेत येणे शक्य झाले नाही, असा जबाब नोंदवला आहे.
लवकरच चार्जशीट दाखल करणार
डॉ. अनाहिता यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमान्वये सात वर्षांच्या शिक्षेचे प्रयोजन नाही. तसेच गुन्हा जामीनपात्र असल्याने त्यांना अटक करण्याची आवश्यकता नसल्याचे पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यांचा जबाब घेणे बाकी असून लवकरच न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. पंडोल यांचा चालक परवाना रद्द करण्याची सूचना
पालघर पोलिसांनी अपघातप्रकरणी दाखल केलेल्या एफआरआयमध्ये डॉ. पंडोल यांनी वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, महामार्गावरील मार्गिकेचे शिस्तपालन करताना अपघाताला आमंत्रण देणे, असे आरोप ठेवत त्यांचा चालक परवाना रद्द करण्यात यावा, असे नमूद केले आहे.