Ganpati Festival : अनंत चतुर्दशीदिवशी 'हे' ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 08:46 PM2018-09-21T20:46:23+5:302018-09-21T20:48:28+5:30
अनंत चतुर्दशीदिवशी मुंबईतील ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ५६ रस्ते एकदिशा मार्ग करण्यात आले आहेत. ९९ ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले असून १८ मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई - अनंत चतुर्दशीदिवशी सार्वजनिक मंडळांच्या गणपतीच्या मिरवणूक रस्त्यावरून निघतात. त्यावेळी वाहनचालकांनी होणारी कुचंबना लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहनचालकांना अगोदरच नियोजन करता यावे यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी वाहतुकीचे नियमन केले आहे. अनंत चतुर्दशीदिवशी मुंबईतील ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ५६ रस्ते एकदिशा मार्ग करण्यात आले आहेत. ९९ ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले असून १८ मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
गणपती विसर्जनासाठी वापरलेली वाहने आणि इतर वाहनचालकांना त्रास होऊ नये यासाठी तीन हजार १६१ वाहतूक पोलीस तैनात असणार आहेत. त्यांच्या मदतीला सुमारे दीड हजार वॉर्डन असतील. वाहतूक पोलिसांच्यावतीने गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, बडा मस्जिद वांद्रे, जुहू चौपाटी, गणेश घाट पवई या ठिकाणी पाच खास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सूचनांचे वाहनचालकांनी पालन करावे असे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
'हे' रस्ते असणार वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
वाहतुकीसाठी बंद केलेल्या मार्गामध्ये दक्षिण मुंबईतील नाथालाल पारेख मार्ग, जिनाभाई राठोड मार्ग, जग्गनाथ शंकरशेट मार्ग, व्ही. पी. रोड, बी. जे. रोड, सी. पी टॅंक मार्ग, दुसरा कुंभारवाडा मार्ग, संत सेना मार्ग, दुसरी सुतार गल्ली, नानूभाई देसाई मार्ग, पंडिता रमाबाई मार्ग, बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, साने गुरुजी मार्ग, डॉ. इ बार्जेस मार्ग, जेराबाई वाडिया मार्ग यांचा समावेश आहे. मध्य आणि पूर्व उपनगरात रानडे रोड, शिवाजी पार्क रोड क्रमांक तीन आणि चार, केळुस्कर मार्ग दक्षिण आणि उत्तर, न. चि. केळकर मार्ग, एम. बी. राऊत मार्ग, टिळक ब्रिज, हेमू कलानी मार्ग, गिडवाणी मार्ग, घाटलागाव, लालबहादूर शास्त्री मार्ग, भट्टीपाडा मार्ग, जंगल मंगल मार्ग, दिन दयाळ उपाध्याय मार्ग, सर्वोदय नगर हे मार्गावरील वाहतूक बंद असेल. पश्चिम उपनगरातही काही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून यामध्ये लिंक रोड, टागोर रोड, जुहू रोड, जुहू तारा रोड, शामराव परुळेकर मार्ग, जनार्दन म्हात्रे मार्ग, आरे कॉलोनी रोड, एस. व्ही. रोड, महात्मा गांधी रोड (कांदिवली), जे. पी. रोड, पंच मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग (बोरिवली) यांचा देखील समावेश असेल.