...अन् म्हैस ओरडतच मूळ मालकाच्या मागे धावू लागली; चोरीला गेलेली म्हैस सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 07:08 PM2021-12-14T19:08:56+5:302021-12-14T19:09:57+5:30
The stolen buffalo was found : सांगोला जनावरांचा बाजार : चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या आले अंगाशी
सांगोला : कोल्हापूर-कुडीत्रे येथून चोरीला गेलेली म्हैस सांगोल्याच्या जनावरांच्या बाजारात दिसताक्षणी मालकाने ती ओळखली. मात्र ग्राहकाने ही म्हैस तुमचीच कशावरून असे फटकारले. यावेळी त्यांनी म्हैस सोडल्यावर कळेल असे म्हणताच सोडलेली म्हैस ओरडतच तिच्या मूळ मालकाच्या मागे धावू लागली आणि चोरीची म्हैस विकत घेणे ग्राहकाच्या चांगलेच अंगाशी आले. हा प्रकार रविवारी सांगोल्यातील जनावरांच्या बाजारात उघडकीस आला. म्हैस खरेदी करणारे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एकाला टमटमसह ताब्यात घेतले. तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
कुडीत्रे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील महेश विलास पाटील यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेली १० हजार रुपये किंमतीची मुऱ्हा जातीची व एक शिंग नसलेली म्हैस तिच्यासोबत ४ हजार रुपयांच्या सहा महिन्याच्या गावठी म्हशीसह १ हजार रुपयांचे सहा महिन्यांचे रेडकू चोरीला गेल्याचे त्यांच्या निर्दशनास आले होते.
याबाबत त्यांनी करवीर पोलिसात म्हैस चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, महेश पाटील यांच्यासह त्यांच्या मित्रांनी रविवारी सांगोल्यातील जनावरांचा बाजार गाठून चोरीला गेलेल्या म्हशीचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना नेमके त्यांच्या म्हशीसह रेडकू झाडाला बांधलेल्या अवस्थेत उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तिच्याजवळ जात ही म्हैस, रेडकू माझे आहे, असे सांगताच तिथे असलेल्या ग्राहकाने ही म्हैस तुमचीच कशावरून, असा प्रश्न उपस्थित केला.
...अन् गुन्ह्याचा झाला पश्चाताप! मुलीचा छळ करणाऱ्या जावयाचा खून; स्वतः केली गळफास लावून
अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; 12 तासात महिलेसह दोघांना अटक
यावेळी म्हैस मालक महेश पाटील यांनी म्हैस सोडून तर बघा म्हणजे कळेल, असे म्हणताच त्याने ती सोडली आणि म्हैस ओरडतच मालकाच्या मागे धावू लागल्याने त्याचे पितळ उघडे पडले. म्हैस सापडल्यानंतर त्यांनी सांगोला पोलीस स्टेशनला येऊन माहिती दिली. दरम्यान, म्हैस चोरीला गेल्याबाबत महेश पाटील यांनी ५ डिसेंबर रोजी करवीर पोलिसात तक्रार दिल्यामुळे आता करवीर पोलिस येऊन म्हैस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महेश पाटील यांना म्हशीसह रेडकू ताब्यात मिळणार आहे.
ही कामगिरी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अस्लम काझी, हवालदार चंद्रकांत गोडसे, पोलीस नाईक केदारनाथ भरमशेट्टी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, गणेश कोळेकर यांनी केली.