...आणि तो निघाला तोतया अधिकारी, शिताफीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:01 AM2022-11-20T11:01:37+5:302022-11-20T11:03:44+5:30
ठाणे : सहायक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून आपल्या साथीदाराचे मदतीने एका रिक्षाचालकाला गणपती रोडवर अडवून त्याच्याजवळील मोबाइल हिसकावला. त्यातील ...
ठाणे : सहायक पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून आपल्या साथीदाराचे मदतीने एका रिक्षाचालकाला गणपती रोडवर अडवून त्याच्याजवळील मोबाइल हिसकावला. त्यातील तो संदेश डिलीट कर असे सांगत मोबाइल हाताळून मोबाइलमध्ये असलेल्या एक्सोडुस नावाच्या बिट कॉइन ॲपमधून सात हजार ६६९ डॉलर अर्थात भारतीय चलनात पाच लाख ७२ हजार ९६४ रुपये त्यांच्या स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करून घेऊन रिक्षाचालकाची फसवणूक केल्याचे प्रकरण उघड केले आहे.
फसवणूक करणाऱ्या तोतया पाेलिसाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव रामदास जगताप (४१, रा. कळवा) असे आहे. अटक आरोपी याने रिक्षाचालकाची फसवणूक केल्याची तक्रार कळवा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यानुसार हिरव्या रंगाची कारविषयी त्यांना माहिती मिळाली. या कारच्या नंबरची माहिती आरटीओकडून मिळाली. तसेच, मोबाइल नंबरच्या तांत्रिक तपास व इतर माहितीच्या आधारे आरोपी याचा राहण्याचा पत्ता शोधण्यात आला. तो कशेळी भिवंडी येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार मोठ्या शिताफीने त्याला अटक केली.
अधिक माहिती घेतली असता रामदास कळवा येथे राहत असल्याची माहिती तपासात पुढे आली. अटक आरोपीकडून गुन्ह्यात फसवणूक केलेल्या रकमेपैकी एक लाख ४० हजार, बनावट गणवेश, एक लाख ६० हजार रुपये किमतीची कार असा तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.