...अन् खटल्यातील मदत पडली पाच कोटींना, दोघांना गुन्हे शाखेकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 11:12 AM2024-01-20T11:12:52+5:302024-01-20T11:12:59+5:30
याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदवत, दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मुंबई : सांताक्रूझमधील व्यापाऱ्याला मुलाला अमेरिकेत नोकरी लावण्यासोबतच जुन्या खटल्यामध्ये मदत करण्याच्या नावाखाली पाच कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदवत, दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सांताक्रूझ परिसरातील तक्रारदार दलजित मथारू यांचा मोटारगाडी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने रवींद्र सहानगर ऊर्फ लक्ष (४०), हनुमंत कांबळे यांना बेड्या ठोकल्या आहेत.
लक्ष हा तक्रारदार यांच्या कार्यालयात व्यवस्थापक पदावर कामाला होता. दुकलीने तक्रारदार यांच्या मुलाला अमेरिकेमध्ये नोकरी लावण्याचे, तसेच धनादेश न वटल्याप्रकरणी खटल्यामध्ये मदत करण्याचे आमिष दाखवून चार कोटी ९५ लाख रुपये उकळले. याशिवाय तक्रारदार यांच्याविरोधात केंद्रीय यंत्रणांमध्ये तक्रार असल्याचे सांगितले. त्यामध्येही मदत करण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा नोंदवत गुन्हे शाखेने अटकेची कारवाई केली आहे.