आई-वडिलांनी दोन मुलींची त्रिशुळानं केली हत्या; स्वत:लाही संपवणार होते, तितक्यात...
By कुणाल गवाणकर | Updated: January 25, 2021 18:22 IST2021-01-25T18:22:11+5:302021-01-25T18:22:51+5:30
धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ; पोलीसही चक्रावले

आई-वडिलांनी दोन मुलींची त्रिशुळानं केली हत्या; स्वत:लाही संपवणार होते, तितक्यात...
चित्तूर: आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कलियुग सत्ययुगात बदलणार असल्यानं आई, वडिलांनी त्यांच्या दोन मुलींची हत्या केली आहे. कलियुगाचं रुपांतर सत्ययुगात होणार असल्यानं दैवी शक्तींनी मुली पुन्हा जिवंत होतील, अशा समजुतीत असलेल्या पालकांनी त्यांच्या पोटच्या मुलींना संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.
मृत मुलींचे आई, वडील अतिशय सुशिक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र तरीही त्यांनी अशा प्रकारचं पाऊल का उचललं याचा शोध पोलिसांकडून सध्या घेतला जात आहे. 'रविवारी रात्री आई, वडिलांनी स्वत:च्या मुलींची हत्या केली. त्यानंतर त्यांनी याची माहिती आपल्या एक सहकाऱ्याला दिली. त्यानंतर सहकाऱ्यानं हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मृत मुलींचे आई वडील बेशुद्धावस्थेत आढळून आले,' अशी माहिती पोलिसांनी दिली.
मदनपल्लीच्या डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या आईनंच त्यांची हत्या केली. एका मुलीला संपवण्याआधी तिचं मुंडन करण्यात आलं होतं. त्यावेळी वडील सर्व पाहत होते. आईनं त्रिशूळाच्या मदतीनं आधी लहान मुलीला संपवलं. त्यानंतर मोठ्या मुलीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे यानंतर दाम्पत्य स्वत:ला संपवणार होतं. मात्र पोलीस वेळीच पोहोचल्यानं पुढील अनर्थ टळला.
मृत मुलींच्या वडिलांचं नाव व्ही. पुरुषोत्तम नायडू (एम. एसस्सी, पीएचडी) आहे. ते मदनपल्लीत सरकारी महिला पदवी महाविद्यालयात एसोसिएट प्रोफेसर आहेत. तर मृत मुलींची आई पोस्ट ग्रॅज्युएट आणि सुवर्ण पदक विजेती आहे. त्या एका स्थानिक खासगी शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.