अंगडिया वसुली प्रकरण: डीसीपी सौरभ त्रिपाठीचा शोध सुरू; गुन्हे शाखेची पथके मुंबईबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:01 AM2022-03-17T07:01:53+5:302022-03-17T07:02:06+5:30
अंगडिया वसुलीप्रकरण अंगलट आले आणि त्यांची बदली करण्यात आली. मात्र, त्यानंतर वैद्यकीय रजेवर जात ते नॉट रिचेबल झाले.
मुंबई : अंगडिया वसुली प्रकरणात आयपीएस अधिकारी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी महिन्याला १० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप अंगडिया असोसिएशनने केला होता. याच प्रकरणात तीन पोलिसांच्या अटकेपाठोपाठ पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीचाही पाहिजे आरोपीमध्ये समावेश करण्यात आला. गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके त्यांच्या शोधासाठी मुंबईबाहेर गेली आहेत.
मूळचे कानपूर येथील असलेले रहिवासी त्रिपाठी २०१०च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर मुंबईत वाहतूक शाखेत नियुक्ती झाली. त्यानंतर परिमंडळ २चे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अंगडिया वसुलीप्रकरण अंगलट आले आणि त्यांची बदली करण्यात आली. मात्र, त्यानंतर वैद्यकीय रजेवर जात ते नॉट रिचेबल झाले.
पैशांची बॅग घेऊन निघालेल्या अंगडियांना आयकर विभागाची भीती घालून वसुली करणाऱ्या एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) ओम वंगाटे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम, पोलीस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्या विरोधात १९ फेब्रुवारी रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी हा गुन्हा सीआययूकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात कदम आणि जमदाडे यांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ पोलीस निरीक्षक ओम वंगाटेलाही अटक करण्यात आली. मंगळवारी त्याच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.